नानावाडी गणेशोत्सव मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम : 2 हजार तुळशीच्या माळा चिकटवल्या
बेळगाव : बेळगावमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण व इकोफ्रेंडली गणेशमूर्ती करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या नानावाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी नवीन संकल्पना राबविली आहे. शाडूपासून गणेशमूर्ती तयार करून त्यावर 2 हजार तुळशीच्या माळा चिकटविण्यात आल्या आहेत. कोणताही रंग न देता अतिशय सुंदर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागील 15 दिवसात केले आहे. यावर्षी मंडळाचे 34 वे वर्ष आहे. नानावाडी गणेशोत्सव मंडळाने यापूर्वीही वेगवेगळ्या गणेशमूर्ती तयार करून घेतल्या आहेत. रुद्राक्ष, पेपर कप, धान्य, फुले, पेपर यांसह इतर वस्तूंचा वापर करून गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. या मंडळाने यावर्षी मूर्तिकार मारुती कुंभार यांच्याकडून 9 फूट उंचीची शाडूची गणेशमूर्ती तयार करून घेतली आहे. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वारकरी गळ्यात घालत असलेल्या तुळशीच्या माळा चिकटविल्या आहेत.
पंढरपूर येथून आणल्या तुळशीच्या माळा
1875 लहान तर 180 मोठ्या तुळशीच्या माळा पंढरपूर येथून आणण्यात आल्या होत्या. महिला तसेच पुरुष कार्यकर्त्यांनी वेळ मिळेल त्याप्रमाणे त्या चिकटविल्या. मनीष पाटील, महेंद्र नंदेश्वर, सचिन नंदेश्वर, सुनील पाटील, आरती पाटील, अवनी पाटील, राखी सावंत, ऋषाली भातकांडे, सुनीता पवार यांनी तुळशीमाळा चिकटविण्याचे काम केले. त्यामुळे ही सुंदर मूर्ती तयार झाली आहे.
मूर्तीमध्ये तुळशीच्या माळांचा सुरेख संगम
नानावाडी गणेशोत्सव मंडळाने दरवर्षी नाविन्यतेवर भर दिला आहे. दरवर्षी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करून मंडळाने नवा आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी तुळशीच्या माळांचा वापर करून गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी अमूल्य ठेवा असलेल्या तुळशीच्या माळांचा सुरेख संगम या मूर्तीमध्ये पाहता येणार आहे.
-नारायण भोसले(गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष)









