खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी : दुपारी सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींचे मिरवणुकीने आगमन होणार
खानापूर : तालुक्यात गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी गणेश चतुर्थी असल्याने रविवारी आणि सोमवारी खरेदीसाठी ग्रामीण भाग तसेच शहरातील नागरिकांची साहित्य खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. शिवस्मारकापासून ज्ञानेश्वर मंदिर, बेंद्रे खुट्ट ते पारिश्वाड रोड या ठिकाणी बाजार मोठ्याप्रमाणात भरला होता. सजावटीला लागणारे साहित्य, फुले, फळे, पुजेचे साहित्य, किराणा आणि कपडे खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून आली.
शिवस्मारक चौकापासून ज्ञानेश्वर चौकापर्यंत तसेच बाजारपेठ ते पारिश्वाड क्रॉसपर्यंतचा बाजार गर्दीने फुलून गेला होता. विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी फळे, सजावटीचे साहित्य, फटाके, कपडे, माटोळ्याचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. भररस्त्यावर फळविक्रेते, भाजीविक्रेते, नारळ, माटोळी साहित्य यासह फुगे विक्रेते, फूल, हार विक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसल्यामुळे बाजारात तुडुंब गर्दी दिसत होती. महिला आणि लहान मुलांकडून कपडे खरेदीची लगबग दिसून आली. तर पुरुष मंडळी गणपतीच्या आरासाचे साहित्य आणि फटाके खरेदी करताना दिसत होती.
बाजारपेठेत दुचाकीस्वारांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. मात्र बाजारपेठेत दुचाकीस्वारामुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शहरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते. बाजारातील गर्दी पाहता कोट्यावधीची उलाढाल झाल्याचे दिसून येत होते. शिवस्मारक चौक ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत दुचाकीच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. पेलीसही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालत होते.
चारचाकी वाहनांवर बंदी घालावी
खानापूर स्टेशनरोडवर विशेषत: राजा शिवछत्रपती चौक ते महाजन खुटापर्यंत बरीच गर्दी असते. गणेशोत्सवाच्या काळात तर वाहने तसेच पादचाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच या रस्त्यावर चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप असल्याने चारचाकी वाहने आत आल्यास वाहतुकीची कोंडी होते. यासाठी पुढील गणेशोत्सव काळात दहा दिवसाकरिता सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत या रस्त्यावऊन चारचाकी वाहने घालण्यास बंदी करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी केली जात आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि दुर्गम भागातील लोक गणेशमूर्ती सोमवारीच घेऊन जाताना दिसत होते. बुधवारी गणेश चतुर्थी असल्याने शहर तसेच आसपासच्या गावातील लोक दिवसभर घरगुती गणेशमूर्ती घरी आणून विराजमान करणार आहेत.
गणेशोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
बुधवारी घरगुती गणपतीचे पूजन झाल्यानंतर दुपारी सार्वजनिक गणपतींच्या मूर्ती मिरवणुकीने आगमन होणार आहे. रात्री उशिरा मंडळांच्या गणपतींचे विधीवत पूजन करून स्थापना करण्यात येणार आहे. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरण गणपती उत्सवमय झाले आहे. यावर्षी गुरुवारी व शुक्रवारी तालुक्याच्या ग्रामीण भागात हुंदरुपी सण साजरा करण्यात येतो. मांसाहारावर ताव मारण्यात येतो. यासाठी बकरी मारण्यात येतात. या दहा दिवसात सार्वजनिक ठिकाणी गणहोम, सत्यनारायण पूजा, महाप्रसादाच्या आयोजनासह सांस्कृतिक, ऑर्केस्ट्रा, पोवाडे असे विविध प्रकारचे आयोजन मंडळाने केले आहे. तसेच ग्रामीण भागात नवीन विवाहित माहेरवासिनींकडून पाचव्या दिवशी ओवसा पूजन व गौरीपूजन करण्याची परंपरा आहे. यासाठी नवीन माहेरवासिनी माहेरला येत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत खानापूर बाजारात ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती.









