हिंडलगानजिक 17 गुंठे भूखंड, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून पत्राचे वितरण
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या मागणीला अखेर यश आले आहे. प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व शिक्षकांसाठी लवकरच ‘गुरुभवन’ बांधले जाणार आहे, यासाठी हिंडलगा गावातील गणपत मंदिरानजिकची 17 गुंठे जागा दिली जाणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मंगळवारी या जमीन मंजुरीचे पत्र शिक्षक संघटनेला देण्यात आले आहे. बेळगाव शहरात शिक्षकांसाठी भवन असावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून शिक्षक संघटनेचा लढा सुरू होता. शिक्षकांचे कोणतेही कार्यक्रम करताना ते इतर समुदाय भवनांमध्ये करावे लागत होते. त्यामुळे कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शिक्षकांच्या या मागणीची दखल घेऊन 17 गुंठे जागा मंजूर करून दिली आहे. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, ग्रामीण गटशिक्षणाधिकारी अंजनेय, आय. डी. हिरेमठ यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









