सुखाची पखरण करणारा, दु:ख विसरायला लावणारा आणि आतुरतेने प्रेरित व्हायला लावणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आगमन बुधवार 27 ऑगस्ट रोजी होत आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अख्ख्या महाराष्ट्रात मंगलमय वातावरण झाले आहे. गणेशोत्सव म्हटला की, कोकणात फार मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने प्रत्येकाच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. यासाठी अनेक अडचणींवर मात करत जगाच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त कोकणवासीय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपापल्या गावी दाखल झाले आहेत. राज्य शासनाने हा उत्सव यावर्षी महाराष्ट्राचा महागणेशोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला असून लाखोंच्या विक्रमी संख्येने चाकरमानी आपापल्या गावी गणेशोत्सवासाठी आले आहेत.
गणेशोत्सव म्हटला की, वातावरण कसे भक्तिमय आणि मंगलमय होऊन जाते. म्हणूनच तर गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष केला जातो. अर्थात जड अंत:करणाने गणरायाला निरोप देऊन पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाची आतुरता लागून राहते. सप्टेंबर महिन्यात येणारा गणेशोत्सव यावर्षी ऑगस्टमध्ये आला. 27
ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्याची पूर्वतयारी मात्र दोन महिन्यांपासून सुरू आहे. गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वे, एसटी, खासगी बसेस अगोदरच बुकींग केल्या होत्या. कोकणात घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने घराची रंगरंगोटी केली गेली आहे.
गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. शेतीचेही नुकसान झाले. या सर्व पूरस्थिती व नैसर्गिक आपत्तीमधून सावरत भाविकांनी गणेशोत्सवाची तयारी उत्साहात केली आहे. महागाईचेही सावट आहे. कडधान्य, डाळी, तेलाचे दर वाढलेलेच आहेत. त्याचबरोबर गणेश मूर्तींचे दरही वाढलेले आहेत. एवढी सगळी परिस्थिती असली, तरी गणेशोत्सवाची तयारी जोरदार करण्यात आली आहे. कोकणातील गरिबातील गरीब व्यक्तीही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो आणि यावर्षीही तो नेहमीच्याच उत्साहात साजरा करत आहे.
श्रावण महिना सुरू होताच अनेक सणांची लगबग सुरू होते. त्यासोबतच घरातल्या सर्व लोकांची आणि अप्रत्यक्षरित्या उद्योग व्यवसायाचीही लगबग सुरू होते. गणरायाच्या आगमनावेळी मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून उत्सव साजरा केला जातो. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला, पोळा, गणेशोत्सव आणि इतर विविध सणांच्या काळात खरेदी-विक्रीमुळे आर्थिक चक्र सुरू राहते आणि पैसा बाजारात फिरत राहतो. इतरवेळी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत नाहीत. मात्र, उत्सवाच्या काळात आपोआपच खरेदी करण्याचे प्रमाण वाढते आणि उत्सवाचे आर्थिक चक्र वेगाने फिरते. त्यात कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच फायदा होतो. त्यामुळे गणेशोत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. कोकणात तर घरोघरी सण साजरा करत असल्यामुळे गणेशाची आगमनाची अधिक उत्सुकता असते.
कोकणातील लोक हे सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा पारंपरिक पद्धतीने घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळे कोकणात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुजली नाही. किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाणही अत्यल्प आहे. सिंधुदुर्गात केवळ 32 सार्वजनिक गणपती आणि 72 हजार 755 घरगुती गणपती विराजमान केले जातात. रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक 114 गणपती व 1 लाख 67 हजार घरगुती गणपती विराजमान होतात. त्यामुळे सार्वजनिक गणपतींपेक्षा घरगुती गणपतींची संख्या मोठी असते. घरोघरी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण असते. म्हणूनच कामानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही कोकणी माणूस असला, तरी गणेशोत्सवासाठी आवर्जून घरी परतलेला दिसतो.
पारंपरिक पद्धतीने कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईसह विविध शहरात राहणारे लोक, देश-विदेशात राहणारे लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने गणेशोत्सवासाठी दाखल झालेले आहेत. यावर्षी तर विक्रमी संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झालेली आहे.
कोकणात रेल्वे, विमानसेवा सुरू होण्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाने एसटी किंवा खासगी बसने येण्याची सोय होती. मात्र, कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून रेल्वे मार्गानेच सर्वाधिक प्रवासी, चाकरमानी येताहेत. चाकरमान्यांनी सहा महिने अगोदरच रेल्वे, बसेसचे बुकींग केलेले होते. जवळपास पाच हजार एसटी बसेस गणेशोत्सवासाठी सोडण्यात आल्या आहेत. शिवाय सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सौजन्याने ‘मोदी एक्सप्रेस’ तर शिंदे शिवसेनेकडूनही स्पेशल ट्रेन सोडलेली आहे. शिवाय कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव हॉलिडे स्पेशल म्हणून जादा रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी लाखोंच्या संख्येने कोकणवासीय कोकणात दाखल झाले आहेत. मात्र, जादा रेल्वे सोडल्याने आणि कोकण रेल्वेचा एकेरीच मार्ग असल्याने सर्व रेल्वे धिम्या गतीने धावत आहेत. कोकणात येण्यासाठी वेळ लागत आहे. तरीही चाकरमानी गणेशोत्सवाच्या ओढीने येत आहेत.
सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत नसली, तरी सिंधुदुर्गलगत असलेल्या गोव्याचे मोपा विमानतळ येथून काही चाकरमानी विमानाने येऊ लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाने एसटी, खासगी बसेस आणि स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र या महामार्गाची दयनीय स्थिती आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम 17 वर्षे सुरूच असून अजूनही ते पूर्ण झालेले नाही. जिथे काम झाले, तिथे ख•sच-ख•s पडले आहेत. परंतु अशा स्थितीतही नाईलाजास्तव काही चाकरमानी गणरायाच्या ओढीने मिळेल, त्या वाहनाने गणेशोत्सवासाठी कोकणात आले आहेत. पुणे, कोल्हापूर मार्गेही अनेक चाकरमानी आले आहेत. त्यामुळे यावर्षी कोकणात आठ ते दहा लाख चाकरमानी विक्रमी संख्येने गणेशोत्सवासाठी आल्याचे समजते. राज्य सरकारने गणेशोत्सव काळासाठी टोलमाफी दिली आहे. गणेश भक्तांना प्रवासात अडचण येऊ नये, यासाठी गणेशोत्सव काळात महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी वाहनाने येणाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने यावर्षीपासून गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महागणेशोत्सव म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महागणेशोत्सव साजरा केला जात आहे. सर्वत्र बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. मंगलमय वातावरण तयार झालेले आहे. किमान अकरा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. कोकणात मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून काही लोक श्रद्धेने 21 किंवा 42 दिवसही गणेशोत्सव साजरा करतात.
कोकणात सर्वाधिक मोठा सण म्हणून गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने हा सण शांततेत व तेवढाच उत्साहात पार पाडण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनांकडूनही सर्व तयारी केली जाते आणि यावर्षी महसूल व जिल्हा प्रशासनाने चोख कामगिरी पार पाडली आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानी गणेश भक्तांचे दोन्ही जिल्ह्यांच्या प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले. चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रेल्वे व बसस्थानके तसेच प्रवेशद्वारावर वैद्यकीय तपासणी पथके तैनात ठेवून आरोग्य तपासणी व उपचारही करण्यात आले आहेत. काही संशयित रुग्णांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले, अशा पद्धतीने गणेश भक्तांची काळजी घेण्यात आली.
एकूणच कोकणात गणेशोत्सव म्हटल्यावर कामानिमित्त बाहेरगावी राहणारे लोक वाट्टेल ती किंमत मोजावी लागली, तरी गणेशोत्सवास आवर्जून येतात. सुट्टी नाही मिळाली, तरी कामावर दांडी मारुन गणपती बाप्पाच्या श्रद्धेपोटी गावी येऊन नोकरी सुद्धा गमावल्याची उदाहरणे आहेत. परंतु, गणेश भक्ती सोडलेली नाही. म्हणूनच यावर्षीही लाखोंच्या संख्येने कोकणात चाकरमानी दाखल झाले आहेत. बुधवार, 27 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवात आता भजने, आरत्या, फुगड्यांच्या कार्यक्रमांनी रात्री जागल्या जाणार आहेत. त्यामुळे कोकणात सध्या मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाची चिंता लागणार आहे.
संदीप गावडे








