वृत्तसंस्था/ मनीला
फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी स्वत:च्या राष्ट्रीय पोलीस प्रमुखांना बडतर्फ केले आहे. पोलीसप्रमुखाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशावर फिलिपाईन्सचे माजी अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते आणि बालतस्करीसाठी एफबीआयच्या वाँटेड यादीत सामील प्रचारक अपोलो कॅरियन क्विबोलोय यांना अटक केली होती. आता पोलीस प्रमुख निकोलस टोरे यांना पदावरून हटविण्यात आले आहे. टोरे यांना मे महिन्यातच राष्ट्रीय पोलीस प्रमुखपदावर नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता.
फिलिपाईन्स सरकारने टोरे यांच्या जागी वरिष्ठ पोलीस जनरल जोस मेलेंसियो नार्टेज ज्युनियर यांना पोलीस प्रमुख म्हणून नियुक्त पेले आहे. तर स्वत:वर कारवाई होण्यापूर्वी टोरे यांनी राष्ट्रीय पोलीस विभागातील 12 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना पदावरून हटविले होते, यात नार्टेज यांचाही समावेश होता. राष्ट्रीय पोलिसांसाठी एक नवी दिशा निश्चित करण्यासाठी टोरे यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.









