डोनाल्ड ट्रम्प नव्या तयारीत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे नाव बदलणार असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. सुरक्षा विभागाला आता पूर्वीप्रमाणेच ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ नावाने ओळखले जाणार आहे. अमेरिकेला स्वयंरक्षणाची गरज नाही, तर आक्रमणाचीही गरज आहे. याचमुळे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे नाव बदलण्यात यावे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. काही आठवड्यांमध्ये अधिकृत आदेश जारी करण्यात येणार आहे. या निर्णयाकरता मला काँग्रेसकडून मंजुरीचीही गरज भासणार नाही. सुरक्षा विभागाचे जुने नाव अधिक मजबूत आणि प्रभावी वाटायचे आणि आता याला पुन्हा बदलण्याची वेळ आली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत 1789 मध्ये युद्धविभाग स्थापन करण्यात आला होता. 1947 पर्यंत या विभागाला याच नावाने ओळखले जात होते. यानंतर तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी याचे नाव बदलून सुरक्षा विभाग केले होते. जेव्हा आम्ही पहिले आणि दुसरे महायुद्ध जिंकलो होतो, तोपर्यंत याला डिपार्टमेंट ऑफ वॉर म्हटले जात होते आणि माझ्यासाठी हेच योग्य नाव आहे. प्रत्येक जण या नावाला पसंत करत होता असा दावा ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्यासोबतच्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. यावेळी संरक्षण सचिव पीट हेगसेथ देखील ट्रम्प यांच्यासोबत होते.
पीट हेगसेथ तुम्हीही सुरक्षा विभाग असा उल्लेख केला, हा प्रकार मला योग्य वाटला नाहे. आम्हाला सुरक्षेची गरज आहे का? पूर्वी या विभागाला ‘युद्ध विभाग’ म्हटले जात होते आणि हे एक मजबूत नाव होते. याचे नाव बदलण्याचा निर्णय केवळ प्रतिकात्मक नाही. मी केवळ सुरक्षा इच्छित नाही, आम्ही आक्रमणही इच्छितो असे उद्गार ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत काढले आहेत.









