सरसंघचालक मोहन भागवत यांची घेतली भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप अध्यक्षाच्या नावावर अद्याप मोहोर उमटलेली नाही. तसेच पक्षाकडुन यासंबंधी कुठलीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु आता बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून अध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते असे बोलले जात आहे. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका केंद्रीय मंत्र्याची भेट घेतल्याने चर्चेला ऊत आला आहे. भाजप अध्यक्षपदासाठी संघाकडून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याचे समजते.
तर पक्ष नेतृत्वाकडून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. यावर 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीनंतर विचार केला जाणार आहे. त्यानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीची माहित दिली जाऊ शकते. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीपूर्वी उत्तरप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक यासारख्या राज्यांचे पक्षप्रमुख निवडले जाणार आहेत.
दिल्लीत महत्त्वाची बैठक
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त आहे. ही बैठक बंद दाराआड 45 मिनिटांपर्यंत चालली. चौहान देखील पक्षाध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत चौहान आणि भागवत यांच्यात चर्चा झाल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या नावांचीही चर्चा
यापूर्वी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, आंध्रप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनति श्रीनिवासन, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव, भाजप नेते विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु यासंबंधी भाजपने अधिकृतपणे काहीही वक्तव्य केलेले नाही.









