गुणाजी गावडे; आम्ही जागा मोफत देण्यास तयार,तात्काळ अंमलबजावणी व्हावी !
न्हावेली / वार्ताहर
येथील विधानसभा मतदारसंघाला आरोग्य सेवेची नितांत गरज आहे. त्यामुळे जमिनीवरून राजकारण करत बसण्यापेक्षा आमदार दीपक केसरकर यांनी वेत्येचा पर्याय स्वीकारावा असा सल्ला वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांनी दिला आहे.या महत्त्वाच्या प्रश्नावरून गेले सात वर्षे केसरकर यांचे राजकारण सुरू आहे. त्याचा फटका सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत श्री गावडे यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ज्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी गेली सात वर्षे आमदार केसरकर आग्रही आहेत ती जागा न मिळाल्यास पर्यायी जागेचा वापर करा विचार करा असा प्रस्ताव खुद्द राजघराण्याने केसरकर यांच्यासमोर ठेवला आहे. मात्र काही झाले तरी त्याच जागेत आपण मल्टीस्पेशालिटी उभारणार असा हट्ट केसरकर त्यांनी धरला आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता ती जागा न्यायालयीन कक्षेत आहे. त्या ठिकाणी वाद असल्यामुळे हा प्रश्न तूर्तास सुटू शकत नाही हे आता निष्पन्न झाले आहे. खुद्द राजघराण्याकडून तसे संकेत देण्यात आले आहेत . त्यामुळे आमदार केसरकर यांनी त्या जागेचा हट्ट सोडून वेत्ये येथील पर्याय स्वीकारावा. त्या ठिकाणी असलेली जागा आम्ही त्यांना मोफत देण्यास तयार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर सात वर्ष रखडलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यात यावे. वेत्ये हे गाव सुद्धा आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात आहे. मुख्य म्हणजे त्याला महामार्ग जोडलेला आहे . त्यामुळे या जागेचा विचार करण्यास हरकत नाही असे गावडे यांनी म्हटले आहे.









