अन्य एक तरूण गंभीर जखमी, स्कूल बसला दुचाकीची जोराची धडक दिल्याने दुर्घटना
वार्ताहर/नंदगड
नंदगड-बिडी रस्त्यादरम्यान गर्बेनहट्टी क्रॉसजवळ स्कूल बस व दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर झाल्याने या अपघातात दुचाकीस्वार मारुती उमेश कोडोळी (वय 20) रा. अवरोळी जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला युवक विठ्ठल फकीर गांजी (वय 21) रा. कामशिनकोप हा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजता घडली. नंदगड येथे काही कामानिमित्त ते आले होते. परत नंदगड-बेकवाड मार्गे आपल्या अवरोळी गावाकडे दुचाकीवरून जात होते. गर्बेनहट्टी क्रॉसजवळ येताच नंदगड येथील बसपण्णा अरगावी इंग्लिश मीडियम स्कूलची बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचवून बेकवाडहून नंदगडकडे येत होती.
दरम्यान स्कूल बसला जोराची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही उडून रस्त्यावर पडले. दोघांच्या हातातोंडाला, डोक्याला जबर मार बसला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने दुचाकी चालक मारुती कोडोळी जागीच ठार झाला. तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेला विठ्ठल गांजी गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तो मूळचा कामशिनकोप येथील असून गेल्या काही वर्षांपासून आपल्या नातेवाईकांच्या घरी अवरोळी येथे वास्तव्यास आहे. दोघेही अविवाहित असून गवंडी काम करून आपल्या कुटुंबीयांना हातभार लावत होते. या अपघातातील मृत मारुती कोडोळी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या भयानक अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे.









