सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली यांची मागणी : महाप्रसादावरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत चर्चा
बेळगाव : यंदा महानगरपालिकेकडून गणेशोत्सवात महाप्रसादाचे आयोजन केले जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले होते. मात्र, महापालिकेला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर महाप्रसाद देण्याचे जाहीर केले आहे? महापालिकेकडे यासाठीचा निधी नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी महाप्रसाद देण्याचे जाहीर करून त्यानंतर लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर महाप्रसाद सर्वांसाठी नसून केवळ मनपा कर्मचाऱ्यांसाठी आहे, असे स्पष्ट केले आहे. लोकांच्या पैशांचा दुरुपयोग करू नये, जिल्हाधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसून काहीही न बोलता जाहीररित्या माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली यांनी सर्वसाधारण सभेत केली.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, त्याचबरोबर तलाव व इतर कामांसाठी निधी खर्च केला जातो. पण जिल्हा प्रशासनाकडून बैठका व काही कामे करावयाची असल्यास महापौर, उपमहापौर व नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. अधिकारी परस्पर बैठका घेऊन निर्णय घेत आहेत. नुकतेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेशोत्सव काळात महानगरपालिकेकडून सर्व गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाईल, असे जाहीर केले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी असे सांगण्यापूर्वी सभागृहाची परवानगी घेतली आहे का? कोणत्या निधीतून महाप्रसाद वाटप केला जाणार आहे? स्वखर्चातून ते करणार आहेत का? यासाठी महापालिकेकडे बजेट नाही. अधिकाऱ्यांकडून काहीही सांगता येते का? लोकांच्या पैशांचा दुरुपयोग होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे उत्तर दिले पाहिजे. खुर्चीवर बसून काहीही बोलता येत नाही. जबाबदार अधिकारीच बेजबाबदार असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. याबाबत सरकारला पत्र लिहिण्यासह राज्यपालांना निवेदन देऊ, असे सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाली यांनी सभागृहात स्पष्ट केले. नगरसेवक शंकर पाटील म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर मनपा आयुक्त, महापौर, उपमहापौर व स्थानिक नगरसेवकांकडून प्रभागांमध्ये फेरफटका मारून समस्यांची माहिती घेतली जाते. मात्र, यंदा समस्यांची पाहणी करण्यात आलेली नाही. एलअॅण्डटीकडून चरीमध्ये टाकण्यात आलेली खडी मोठी असल्याने त्यामुळे अपघात होत आहेत. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात
नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले, गणेशोत्सव केवळ एक दिवसांवर आहे. यापूर्वी तुम्ही वन खात्याची बैठक घेतला होता. त्याचे पुढे काय झाले? गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेने काय आराखडा तयार केला आहे? याची माहिती द्यावी. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पण ते अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. आगमन सोहळा सुरू झाला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना हाती घेण्यात याव्यात, अशी मागणी केली.
नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कार्य
महापौर मंगेश पवार यांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी सभागृहात करण्यात आल्या. त्यानंतर स्वत: महापौरांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. खुलासा करताना म्हणाल्या, अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कुमार गंधर्व रंगमंदिरमध्ये पार पडलेल्या बैठकीत मी हजर होते. यापुढे महापौर, उपमहापौर व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कार्य केले जाईल. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता नाही. पावसामुळे अडचण निर्माण होत आहे. बुकलेटच्या माध्यमातून सर्व माहिती नगरसेवकांना दिली जाईल, असेही त्या म्हणाल्या. खड्डे बुजविण्याचा ठेका देऊन तीन महिने झाले आहेत. पण प्रत्यक्षात अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. महापालिकेची बदनामी करणारेच आता अधिकाऱ्यांसोबत शहरात फिरत आहेत. काही ठिकाणी खड्डे बुजवले जात आहेत. मात्र खड्ड्यांच्याभोवती खोदकाम करण्यापूर्वीच ते बुजविले जात आहेत. सदर काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने बुजविलेल्या खड्ड्याची दुसऱ्या दिवशीच पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.









