बेळगाव : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेर नगरसेवकांच्या इंदूर अभ्यास दौऱ्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानुसार लवकरच 58 लोकनियुक्त नगरसेवक, 5 सरकारनियुक्त नगरसेवक व 2 अधिकारी या अभ्यास दौऱ्याला रवाना होणार आहेत. या दौऱ्याला मनपा आयुक्त शुभा बी. यांनीदेखील यावे, असा आग्रह सभागृहाने केला. त्यामुळे आयुक्तांनी होकार दिला. विद्यमान सभागृहाचा याआधी एक अभ्यासदौरा झाला आहे. 2025 सालीच लोकनियुक्त नगरसेवक व अधिकारी चंदीगढ दौऱ्यावर जाऊन आले आहेत. यानंतर आता इंदूर दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. खरेतर महापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीचे सदस्य इंदूर दौऱ्यावर जाणार होते. श्रीशैल कांबळे आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष असताना याबाबतचा ठरावही करण्यात आला आहे.
पण वर्षभराच्या कार्यकाळात या दौऱ्याचे आयोजन झाले नाही. आता मात्र सर्वच नगरसेवकांना इंदूरला जाण्याची संधी मिळाली आहे. इंदूर दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर तातडीने बेळगावातही विविध प्रोजेक्टना सुरुवात केली जाईल. त्याला सर्व नगरसेवकांनी साथ द्यावी, अशी विनंती मनपा आयुक्त शुभा बी. यांनी केली. मनपा आयुक्तांना बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर बनवायचे आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांचे सहकार्य तुम्हाला राहील, असे यावेळी नगरसेवकांनी स्पष्ट केले. इंदूर दौऱ्याला सभागृहात मंजुरी मिळाल्याने गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद संपल्यानंतर तारीख निश्चित करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. प्रभाग क्र. 2 मध्ये विविध समस्या आहेत. याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा संपर्क साधला तरीही अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, असा आरोप नगरसेवक मुजम्मील डोणी यांनी बैठकीत केला.









