गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न
बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी गणेशभक्तांना वाहने उभी करण्यासाठी स्थळनिश्चिती केली आहे. काही सरकारी मैदानांबरोबरच पे पार्किंगमध्येही वाहने उभी करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत उत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी परजिल्ह्यातून, परराज्यातूनही गणेशभक्त बेळगावला येतात. या काळात गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असते. ही गोष्ट लक्षात घेऊन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी वाहने पार्क करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांची व्यवस्था केली आहे.
सरदार्स हायस्कूल मैदान, क्लब रोडवरील सीपीएड मैदान, जुने भाजी मार्केट, देशपांडे खूट ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याशेजारच्या खाली जागेवर, कॅन्टोन्मेंट झोन-1, कॅटल मार्केट परिसर (भरतेश शिक्षण संस्थेजवळ), महाद्वार रोड येथील छत्रपती संभाजी उद्यान, बापट गल्ली पे पार्किंग, न्युक्लियस मॉल बेसमेंट, रामलिंगखिंड गल्ली येथील लक्ष्मी पे पार्किंग, याच परिसरातील गणेश पे पार्किंग, शेरी गल्ली येथील सोमनाथ पे पार्किंग, कॅम्प येथील महिला पोलीस ठाण्याच्या पाठीमागील खुल्या जागेवर वाहने उभी करता येणार आहेत.
गणेशभक्तांनी दिसेल तेथे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळे निर्माण करण्याऐवजी स्थळनिश्चिती करण्यात आलेल्या जागांवर वाहने उभी करून सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी 6 व 7 सप्टेंबर रोजी बेननस्मिथ संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचे मैदान, कॉलेज रोड, मराठी विद्यानिकेतनचे मैदान, श्रीमती उषाताई गोगटे माध्यमिक शाळेचे आवार, पाटील गल्ली, कॅम्प येथील इस्लामिया एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे ऊर्दू व इंग्लीश मीडियम शाळेचे मैदान, बी. के. मॉडेल हायस्कूल व पीयु कॉलेज आवारात वाहने उभी करता येणार आहेत.
कॅन्टोन्मेंटने घातलेले हाईट बॅरियर काढले
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांची वाहतूक मिलिटरी महादेव मंदिराजवळून ग्लोब सर्कल व अरगन तलाव परिसरात वळविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मिलिटरी महादेव व महात्मा गांधी सर्कल परिसरात कॅन्टोन्मेंटने घातलेले हाईट बॅरियर काढण्यात आले असून अवजड वाहन चालकांनी या मार्गावरून आपली वाहने नेण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.









