ऑपरेशन करतेवेळी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा ठपका
बेळगाव : पोटदुखीच्या आजारावर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या इंगळगी, ता. सौंदत्ती येथील एका तरुणाच्या आतड्यांना शस्त्रक्रियेच्यावेळी धक्का पोहोचविल्याची घटना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. इंगळगी, ता. सौंदत्ती येथील महेश फकिराप्पा मादर (वय 22) हा तरुण सध्या संकटात आला आहे. 20 जून रोजी पोटदुखीच्या वेदना असह्या झाल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात दाखल केले. बैलहोंगलमधून त्याच दिवशी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर महेश किंचाळत होता. त्याच्या वडिलांनी डॉक्टरांना भेटून ही गोष्ट सांगितली असता ‘कशाला आमचा जीव खाता?’ असे सांगत उलट त्यांनाच आरडाओरड करण्यात आली. त्याचे किंचाळणे वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याचे हातपाय कॉटला बांधले. दुसऱ्या दिवशी 21 जून रोजी ड्युटी डॉक्टरनी त्याची तपासणी करून अतिदक्षता विभागात ठेवायला पाहिजे, असे सांगितले. 22 जून रोजी कुटुंबीयांनी पुन्हा डॉक्टरांकडे विचारणा केली. आज रविवार आहे, उद्या बघू, असे सांगण्यात आले.
रात्री महेशचा त्रास वाढला. तो पुन्हा किंचाळू लागला. त्यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी त्यालाच आरडाओरड केली. त्याला येथून घेऊ जा, असे सांगत मध्यरात्री 12 वा. बाहेर काढले. त्याचवेळी कुटुंबीयांनी खासगी इस्पितळ गाठले यासंबंधी खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी तपासणीअंती सिव्हिल हॉस्पिटलमधील दुर्लक्षपणामुळे त्याच्या आतड्यांना धक्का पोहोचला आहे. त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे सांगितले. 23 जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यानंतर महिनाभर तो इस्पितळात होता. कुटुंबीयांनी संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यासाठी एपीएमसी पोलीस स्थानकात पोहोचले.
त्यावेळी एफआयआर दाखल करता येत नाही, असे सांगत त्यांना परत पाठविण्यात आले, असा आरोप अखिल कर्नाटक आंबेडकर युवा संघटनेचे राज्याध्यक्ष फकिराप्पा दुर्गाप्पा होसमनी यांनी केला आहे. यासंबंधी समाज कल्याण अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की महेश मादर या तरुणावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या त्याच्यावर खासगी इस्पितळातही उपचार केले आहेत. त्याच्या आतड्यांना धक्का पोहोचल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. यासंबंधी तज्ञ डॉक्टरांची समिती नेमून चौकशी करण्यात येणार आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा दुर्लक्षपणा आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.









