शांतता समितीच्या बैठकीत पोलीस दलाला सहकार्य
बेळगाव : शुक्रवार दि. 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 5 ऐवजी रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी ही मिरवणूक होणार आहे. सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सिरत कमिटीचे पदाधिकारी, अंजुमनचे सदस्य आदींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सोमवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पोलीस आयुक्तांबरोबरच कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी व शहरातील इतर अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते. अंजुमन समिती व जमातच्या प्रमुखांनी या बैठकीत मिरवणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वानुमते होकार दिला आहे.
बुधवार दि. 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. 6 सप्टेंबर रोजी श्री विसर्जन मिरवणूक होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 5 ऐवजी 14 सप्टेंबर रोजी ईद-ए मिलादची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व जमातचे पदाधिकारी, मौलाना आदीही यावेळी उपस्थित होते. ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजेला परवानगी देऊ नये, असे निवेदन काही जमातच्या प्रमुखांनी दिले होते. यावरही बैठकीत चर्चा झाली. सिरत कमिटी व अंजुमन कमिटीनेही डीजेला परवानगी देऊ नये, याउलट मिरवणूक उत्साहात पार पडण्यासाठी पोलीस दलाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. पोलीस दलाकडून संपूर्ण सहकार्य असणार आहे, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पोलीस दलाला सहकार्य केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी मुस्लीम बांधवांचे आभार मानले आहेत.









