काकतीतील रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : काकती येथील विविध गल्ल्यांमध्ये भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे येथील रहिवाशांना खूप त्रास होत असून प्रसंगी कुत्री येणाऱ्या-जाणाऱ्यांवर धावून जात आहेत. याआधीच 15 ते 20 लोकांचा कुत्र्यांनी चावा घेतला असून, त्यांना रेबीज होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी काकती रहिवाशांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गल्लीतून जात असताना कुत्री अंगावर येत असून वृद्धांनाही चावत आहेत. मुले शाळेत जाताना-येताना तसेच अपंगांवरही हल्ला करत आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लोकांना जगणे कठीण होत आहे. त्यामुळे कुत्र्यांवर आळा घालावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित स्थानिक विभागांना आदेश जारी करून काकती रहिवाशांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्याचीही मागणी करण्यात आली.









