वार्ताहर/किणये
वाघवडे गावातील बालसंस्कार केंद्राच्या वतीने गावातील समशानभूमीची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील स्मशानभूमीमध्ये झाडेझुडपे केरकचरा पडला होता. बालसंस्कार केंद्राच्या तरुण कार्यकर्त्यांनी एक दिवस आपल्या गावातील स्मशानभूमीसाठी कामकाज करण्याचा संकल्प केला. गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी हे तरुण कार्यकर्ते स्मशानभूमीची स्वच्छता करत आहेत. यावर्षीही त्यांनी ही मोहीम राबविली आहे. स्मशानभूमीत मोठ्याप्रमाणात झाडेझुडपे वाढलेली होती. तसेच केरकचरा पडला होता.अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
याची दखल घेऊन बालसंस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत साफसफाई केली आहे. यामध्ये सुशांत डांगे, कलाप्पा पाटील, कृष्णा पाटील, योगेश बेळगावकर, रुपेश गुरव, चिदंबर गुरव, आदिंसह कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. यापूर्वीच याकेंद्राच्या माध्यमातून स्मशानभूमीमध्ये शेडची उभारणी केली आहे. तसेच अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. मात्र या स्मशानभूमीमध्ये अजूनही पेवर बसविण्याचे कामकाज शिल्लक आहे. तसेच विद्युत पुरवठा करणे गरजेचे आहे. याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे असे तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहेत. गावातील स्मशानभूमीची स्वच्छता केल्यामुळे बालसंस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.









