वृत्तसंस्था / बेंगळूर
29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सीएएफए नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेसाठी नवे प्रमुख प्रशिक्षक खलिल जमील यांनी सोमवारी 23 सदस्यांचा भारतीय फुटबॉल संघ जाहीर केला. या स्पर्धेमध्ये भारतीय फुटबॉल संघाला ताजिकिस्तानकडे प्रयाण करावे लागणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाचा ब गटात समावेश असून या गटामध्ये यजमान ताजिकिस्तान, विद्यमान विजेते इराण आणि अफगाण यांचा समावेश आहे. भारतीय फुटबॉल संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना यजमान ताजिकिस्तानबरोबर 29 ऑगस्टला खेळविला जाईल. यानंतर भारतीय संघाचे पुढील सामने इराण बरोबर 1 सप्टेंबरला तर अफगाण बरोबर 4 सप्टेंबरला होणार आहेत.
या स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाची अंतिम निवड करण्यापूर्वी संभाव्य 29 फुटबॉलपटूंसाठी प्रशिक्षण सराव शिबिर आयोजित केले होते. या शिबिरानंतरच प्रमुख प्रशिक्षक खलिद जमील यांनी 23 सदस्यांचा संघ निवडला. गेल्या शुक्रवारी या सराव शिबिरामध्ये इस्ट बंगालचे अन्वर अली, एन. एन. महेशसिंग आणि टी. जॅक्सनसिंग यांनी आपला सहभाग दर्शविला होता. त्याच प्रमाणे एम. एस. जितीन याचीही या संघात निवड झाली आहे. अनुभवी गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. भारताचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्री भारतीय संघाचा सदस्य नसल्याने त्याला शिबिरासाठी वगळण्यात आले होते. मोहन बागानचा लिस्टन कुलासो, मनवीर सिंग आणि सुभाषिश बोस हे निवड चाचणीवेळी उपलब्ध राहू शकले नाहीत.
ताजिकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील. प्ले ऑफ फेरीतील सामन्यांना 8 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. या दोनगटातील उपविजेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानासाठी लढत होईल. तर विजेत्यांमध्ये अंतिम लढत ताश्कंद येथे खेळविली जाईल
भारतीय फुटबॉल संघ: गोलरक्षक-गुरप्रित सिंग संधू, अमरिंदर सिंग, ऋतिक तिवार, बचावफळी- राहुल भेके, एन. रोशन सिंग, अन्वर अली, संदेश झिंगन, चिंगलेनसाना सिंग, एच. राल्ते, मोहम्मद युवाई, मध्यफळी -निखिल प्रभू, सुरेश सिंग वांगजाम, दानीश फरुकी भट्ट, जॅक्सन सिंग, बोरीस सिंग, ए. कुर्नियान, उदांता सिंग, एन. महेशसिंग, आघाडी फळी- इरफान यादवाड, मनवीर सिंग ज्युनियर, एम. एस. जितीन, एल. छांगटे, विक्रम प्रतापसिंग.









