उंब्रज :
आशियाई महामार्गावर वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत कंटेनर चालकाचा मद्यधुंद अवस्थेतील थरार रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाहायला मिळाला. कंटेनर वराडे येथील दुभाजकाला धडला. अपघातानंतर कंटेनर दुभाजक व रस्त्यावर अडकून पडल्याने सुमारे दीड तास दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करताना तळबीड पोलीस व महामार्ग पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली. सुमारे दोन तास क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू होते.
महामार्गावर सातारा ते कोल्हापूर लेनवर रविवारी २४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत भराव पुलावर कंटेनरला अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेला चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकाला धडकून दुभाजकावर जाऊन अडकला. पुलावर घडलेल्या या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कंटेनरचा चालकास दारूच्या नशेत कंटेनरमधून नीट चढता उतरता येत नव्हते. अशा अवस्थेत महामार्गावरून त्याचा प्रवास सुरू होता. अपघात झाला तेव्हा मागेपुढे इतर वाहने नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेचे गांभीर्य ओळखून तळबीड पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. तासवडे टोलनाका व शिवडे गावच्या हद्दीपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वराडे येथे सध्या महामार्ग रुंदीकरणाचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. या कामामुळे दररोज वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच रविवारी झालेल्या अपघातानंतर अपूर्ण असलेल्या सेवारस्त्यांवरून वाहतूक सोडावी लागली. त्याचा प्रचंड त्रास वाहनधारकांना सहन करावा लागला.
कंटेनर वराडे गावच्या पुलावर अडकून वाहतूक कोंडी झाल्याने घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कंटेनर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. क्रेन बोलावण्यात आली. मात्र अडकलेला कंटेनर क्रेनच्या सहाय्यानेही न निघाल्याने दीड तास कंटेनर काढण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.
कंटेनर चालक ताब्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकास तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. या घटनेने महामार्गावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह करणाऱ्या चालकांमुळे भीतीचे वातावरण आहे. अशा चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.








