बेळगाव : गणेशोत्सवाची प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यासोबत रंगरंगोटीचे काम करण्यात आले. गणेश मूर्तींचे विसर्जन सुलभरित्या व्हावे यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. जक्कीनहोंड येथील तलावातील गढूळ पाणी हटविल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कपिलेश्वर जुने व नवे वसर्जन तलाव, जक्कीनहोंड, अनगोळ, जुनेबेळगाव, वडगाव येथे हे तलाव आहेत. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त शुभा बी.व महापौर मंगेश पवार यांनी विसर्जन तलावांची पाहणी केली होती. त्यावेळी तलावांच्या स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली.
शनिवारी जक्कीनहोंड येथील खराब पाणी हटवून त्या ठिकाणी तलावाचे रंगकाम करण्यात आले. तर कपिलेश्वर नव्या विसर्जन तलावातील निर्माल्य तसेच गाळ काढण्याचे काम रविवारी महानगरपालिकेकडून करण्यात आले. मोटारीच्या साहाय्याने तलावातील पाणी बाहेर काढण्यात येत होते. याबरोबरच इतर तलावांची स्वच्छता देखील करण्यात येत आहे. गणेश चतुर्थी बुधवार दि. 27 रोजी असून, 28 रोजी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.त्यासाठी महानगरपालिका, पोलीस तसेच हेस्कॉमकडून विसर्जनाची तयारी केली जात आहे.









