शहरात खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी, झाडांच्या फांद्या हटविण्याची सूचना
बेळगाव : महापौर मंगेश पवार व महापालिका आयुक्त शुभा. बी यांनी शुक्रवारी विसर्जन तलावांसह रस्त्यांची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी शहरात खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी, तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी येत्या दोन दिवसांत केली जाईल, अशी माहिती शुभा बी. यांनी दिली. कपिलेश्वर विसर्जन तलावासह नाझर कॅम्प वडगाव, जक्कीनहोंड, जुने बेळगाव,अनगोळ यासह इतर भागातील विसर्जन तलावांची महापौरांनी पाहणी केली. विसर्जनावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच विसर्जन तलावांची स्वच्छता करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. शहरातील खड्ड्यांमध्ये पॅचवर्क केले जाईल व विसर्जन मार्गावरील गटारी बंदिस्त केल्या जातील, असे आयुक्तांनी सांगितले.
प्रशासनाकडून संयुक्तरित्या पाहणी
शहरातील गणेशोत्सव विसर्जन मार्गाची शुक्रवारी पोलीस, महानगरपालिका,हेस्कॉम व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी केली. राणी चन्नम्मा चौकापासून ते कपिलेश्वर विसर्जन तलावापर्यंत पाहणी करून विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याची सूचना करण्यात आली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.









