थोर स्वातंत्र्यसेनानींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही गल्ली खरोखरच आहे गौरवशाली अन् समृद्ध
आजच्या ‘बेळगाव’ शहराच्या जडणघडणीत येथे निर्माण झालेल्या विविध गल्ल्यांचा मोलाचा वाटा आहे. या गल्ल्यांनी केवळ वस्तीचा विकास केला नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचं जतनही केलं आहे. अशाच बेळगावच्या प्रमुख गल्ल्यांची ओळख करून देणारी “माझं वेणुग्राम” ही विशेष मालिका ‘तरुण भारत’च्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या मालिकेतील दुसरं पर्व ‘कडोलकर गल्ली’ या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गल्लीस समर्पित आहे. एकेकाळी केवळ सहज गल्लीत फेरी टाकली तरी कोण घरी आहे, कोण परगावी गेलं, कोणाचं लग्न आहे, कोणाच्या घरात सध्या दु:खाचं सावट आहे, शेताची स्थिती, गुरांची हालचाल, देव-धर्म, परंपरा, यात्रा-जत्रांची तयारी अशा असंख्य गोष्टी आपोआप समजायच्या. नात्यांची वीण केवळ रक्तात बांधलेली नव्हती, तर मानलेल्या, तयार केलेल्या आणि जाणीवपूर्वक जोपासलेल्या नात्यांनीच ‘आपुलकी’ या शब्दाला अर्थ दिला होता. हीच गोष्ट आजही जपली गेली आहे- कडोलकर गल्लीत. कडोलकर गल्ली ही केवळ एक व्यापारी केंद्र नाही, तर ती संवादाची, सहवासाची आणि संस्कृतीची जिवंत शाळा आहे. येथे चालणाऱ्या साध्याशा संवादालाही एक ऊर्जादायी, मनाला भिडणारा स्पर्श असतो. येथे येताच ही अनुभूती अगदी आपसूक मिळते.
इतिहासाचा सुवर्ण ठसा
या गल्लीतून लोकमान्य टिळक, सेनापती बापट यांच्यासारखे थोर स्वातंत्र्यसेनानीही येऊन गेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही गल्ली खरोखरच गौरवशाली आणि समृद्ध आहे. या गल्लीच्या सुरुवातीला, जिथे किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली आणि रामदेव गल्लीचा संगम होतो त्या ठिकाणी हुतात्मा चौकात देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना समर्पित असलेले हुतात्मा स्मारक आजही त्या क्षणाची साक्ष देत दिमाखात उभे आहे. कडोलकर गल्लीत बेळगावातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना याळगी कुटुंबीयांच्याच घरात झाली होती. पुढे गणेशभक्तांच्या वाढत्या संख्येमुळे रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनी या गणपतीची स्थापना कांदा मार्केटजवळ केली आणि गणेश मंडळाची पायाभरणी करण्यात आली, अशी माहिती या गल्लीतील ज्येष्ठ नागरिक अभय याळगी यांनी दिली. रिटायर्ड कर्नल विजयसिंह मिसाळ यांनी देशासाठी दिलेल्या योगदानासोबतच कडोलकर गल्लीतील सामाजिक भान आणि देशप्रेम यांची महत्त्वपूर्ण माहिती दिली. ज्येष्ठांचा अनुभव, व्यावसायिकांची साक्ष, सुवर्ण व्यवसायातील प्रगतीविषयी माहिती दिली दिवंगत सुवर्ण व्यावसायिक दिलीप हळदणकर यांनी.
व्यावसायिक वैभवाची पंढरी
कडोलकर गल्ली एकेकाळी लोणी व फळविक्रीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. आसपासच्या गावातील दूध उत्पादक आपले दूध, दही, लोणी येथे विक्रीस आणत. इथूनच त्याची पुणे-मुंबईसह अन्य ठिकाणी निर्यात होत असे. एवढंच नव्हे, तर मुंबईच्या दादर बाजारात “येथे बेळगावचे लोणी मिळेल” असे फलकसुद्धा झळकत असत. मात्र आता लोण्याचा व्यवसाय सध्या काही मोजक्या दुकानांपुरताच सीमित राहिला आहे, अशी माहिती सिद्धार्थ कलखांबकर आणि संदीप पाटणेकर यांनी दिली. कडोलकर गल्लीतील फळबाजार देखील पूर्वी अगदी भरलेला असे. मात्र, कालांतराने बेळगावमध्ये स्वतंत्र फळबाजार स्थापन झाल्यावर येथील फळविक्रेत्यांची संख्या रोडावली. कोल्हापुरी चपलांसाठीही ग्राहकांची पसंती ही याच गल्लीला होती. कोल्हापुरी चपलांचा व्यवसाय करणारे प्रवीण पोवार यांनी याच गल्लीतून आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या आठवणी सांगितल्या. व्यस्त व्यापाऱ्यांच्या दैनंदिनात ताजेपणा आणणाऱ्या गरम चहाचा अनुभव सांगितला मंजुनाथ कोठारे यांनी, जे अनेक वर्षांपासून इथल्या गल्लीतील दुकानांमध्ये चहा पुरवत आहेत.
समाजबंधांचे प्रतीक
कडोलकर गल्ली ही केवळ व्यापाराची नाही, तर सामाजिक सलोखा, देशभक्ती, शेजारधर्म आणि सहजीवनाची एक आदर्श प्रतीक आहे. येथे आजही मानवी नात्यांचे रेशमी धागे घट्ट गुंफले गेले आहेत. ही गल्ली आजही त्याच ओळखीने उभी आहे-अभिमानाने, आत्मियतेने आणि इतिहासाच्या साक्षीदारासारखी.
‘तरुण भारत’च्या “माझं वेणुग्राम”या विशेष माहितीपट मालिकेद्वारे आपण अशाच अनेक ऐतिहासिक गल्ल्यांचा मागोवा घेणार आहोत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी.









