वृत्तसंस्था / कोलकाता
सध्या सुरू असलेल्या 134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या बक्षीस रक्कमेत विक्रमी वाढ करण्यात आली आहे. आशियातील ही सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यावेळी या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1.21 कोटी रुपयांचे बक्षीस स्पर्धा आयोजकांनी जाहीर केले आहे.
येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर शनिवारी डायमंड हार्बर एफसी आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. ड्युरँड चषक स्पर्धा आयोजन समितीने यावेळी बक्षीस रकमेमध्ये पूर्वीच्या तुलनेत 250 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत एकूण बक्षिसाची रक्कम 3 कोटी रुपये जाहीर करण्यात आली आहे. 2025 सालातील ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धा 23 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान होत आहे. या स्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश होता. हे संघ सहा गटात विभागण्यात आले होते. स्पर्धेतील सामने जमशेदपूर, इंफाळ, कोक्राजेर, शिलाँग, कोलकाता येथे खेळविले गेले. प्राथमिक फेरीनंतर आठ संघ बाद फेरीत दाखल झाले.
विजेत्या संघाला 1.21 कोटी रुपये, उपविजेत्या संघाला 60 लाख रुपये, उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 25 लाख रुपये, उपांत्यपूर्व फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 15 लाख रुपये देण्यात येतील. वैयक्तिक बक्षिसे : स्पर्धेतील सर्वोत्तम फुटबॉलपटूला गोल्डन बॉल, सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूला गोल्डन बूट, सर्वोत्तम गोलरक्षकाला गोल्डन ग्लोव्ह्ज, तसेच वैयक्तिक विजेत्या फुटबॉलपटूंना याशिवाय रोख 3 लाख रुपये आणि महिंद्रा कंपनीची नवी कार दिली जाणार आहे.









