पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांची विधानपरिषदेत माहिती : 230 कोटींचा आराखडा तयार
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक सौंदत्ती यल्लम्मा मंदिर परिसराच्या विकासासाठी 230 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत या आराखड्यानुसार विकासकामे पूर्ण होतील, अशी माहिती पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.
शुक्रवारी विधानपरिषदेत कर्नाटक पर्यटन व्यापार (सुविधा आणि नियमन) अधिनियम विधेयकावर बोलताना ते म्हणाले, सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्र हे राज्यातील अत्यंत प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. देश-विदेशातून भाविक येथे येतात. भाविकांना किमान मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही 230 कोटी रुपयांची योजना आखली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. लवकरच निविदा मागविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्र विकासाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडेही प्रस्ताव सादर केला आहे. येथील विकासकामे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होतील. यामुळे असंख्य भाविकांना अनुकूल होईल, असा विश्वासही मंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती तालुक्यातील अंजनाद्री टेकडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाईल. येथे एकूण 11 रोप वे (केबल कार) बसविण्यात आल्या आहेत. याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आम्ही केवळ नफा-तोट्याचा विचार करून पर्यटन स्थळांचा विकास करत नाही, आपल्या राज्यातील पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच पर्यटकांची संख्या वाढावी, हा आमचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
सदर विधेयकावर विधानपरिषद सदस्य आयवान डिसोझा, एच. विश्वनाथ, हेमलता नायक, बी. एच. पुजार व इतरांनी मते मांडली. त्यानंतर मंत्री एच. के. पाटील यांनी माहिती दिली. त्यानंतर हे विधेयक संमत करण्यात आले.









