सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलंबो
सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक करण्यात आली आहे. 76 वर्षीय विक्रमसिंघे यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयातून अटक करण्यात आली. याठिकाणी त्यांना सरकारी निधीच्या कथित गैरवापराच्या चौकशीसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
2023 मध्ये राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नी प्राध्यापक मैत्री विक्रमसिंघे यांच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचा लंडनला कोणताही अधिकृत दौरा नव्हता, तरीही तो सरकारी खर्चाने झाला होता. या दौऱ्यात 10 जणांचा एक गट सहभागी झाला होता. तसेच त्यावर सुमारे 1.69 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यावेळी विक्रमसिंघे क्युबा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर होते, त्यानंतर ते खासगी भेटीसाठी ब्रिटनला गेले होते. याशिवाय, त्यांच्या वैयक्तिक अंगरक्षकाला सरकारी तिजोरीतून पगार दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अटक झालेले पहिले माजी राष्ट्रपती
रानिल विक्रमसिंघे शुक्रवारी सकाळी भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (एफसीआयडी) येथे पोहोचले होते. 4 तास चाललेल्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. श्रीलंकेच्या इतिहासात अटक झालेले ते पहिले माजी राष्ट्रपती बनले आहेत. त्यांना कोलंबो फोर्ट मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले होते.
रानिल विक्रमसिंघे यांच्यावर सप्टेंबर 2023 मध्ये त्यांची पत्नी मैत्रीच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला जाण्यासाठी सार्वजनिक निधीचा वापर केल्याचा आरोप आहे. विक्रमसिंघे एका अधिकृत कार्यक्रमानंतर अमेरिकेतून परतत होते. याचदरम्यान त्यांच्या पत्नी खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरकारी खर्चाने ब्रिटनला गेल्या होत्या. सीआयडीने यापूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांना या प्रवासात झालेल्या खर्चाबद्दलही विचारपूस केली होती.
2024 च्या अखेरीस गोटाबाया राजपक्षे यांच्या जागी विक्रमसिंघे यांनी त्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. 2022 च्या आर्थिक संकटातून श्रीलंकेला बाहेर काढण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले. त्यांनी जुलै 2022 ते सप्टेंबर 2024 पर्यंत राष्ट्रपतीपद भूषवले होते. ज्येष्ठ नेते विक्रमसिंघे सहावेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत.









