गेल्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्रात हवामानाने अचानक घेतलेल्या पालटामुळे राज्यभरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला होता. या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत केले असून, शेती, पायाभूत सुविधा आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. या संकटाचा ज्यांच्यावर प्रभाव पडतो त्या जनतेने याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, यंदा पुन्हा एकदा पावसाच्या तडाख्यात सापडली आहे. 19 ऑगस्ट रोजी अवघ्या 6 ते 8 तासांत 177 मिमी पाऊस पडल्याने शहरातील 14 ठिकाणी पाणी साचले. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर हिंदमाता, अंधेरी सबवे आणि बीकेसीसारख्या सखल भागात पाणी भरल्याने वाहतूक कोंडी आणि लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल झाले. मरिन ड्राइव्ह, कुलाबा, दादर, सायन, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, चेंबूर आणि भांडूप यांसारख्या भागांत पावसाचा जोर जाणवला. परिणामी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली, तर सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली. या काळात 8 जणांचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना मैदानात उतरवले. पण, त्याने नुकसान पूर्णत: टळत नाही.
प्रभावित जिल्हे आणि त्यांचे नुकसान
मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांमध्ये समुद्राच्या भरतीमुळे आणि मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा येथे नद्यांना पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना येथेही पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक येथे पाणी साचल्याने रस्ते, पूल आणि घरांचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथेही पावसाचा जोर कायम आहे. एकूणच, राज्यातील 36 पैकी 25 जिल्हे या पूरपरिस्थितीने प्रभावित झाले आहेत. सुमारे 10 लाख एकर खरीप पिके पाण्याखाली गेली असून, धरणे 93 टक्के भरली आहेत, त्यांचा आपत्कालीन विसर्ग करण्याची वेळ आली आहे. ज्यामुळे पाण्याचा निचरा करणे आव्हानात्मक ठरले आहे. हे पाणी गावे आणि शहरांमध्ये धुमाकूळ घालत आहे व गेली काही वर्षे ते सातत्याने घडत आहे.
हवामान बदलाचे परिणाम
हवामान तज्ञांच्या मते, या तीव्र हवामान घटनांमागे हवामान बदल हे प्रमुख कारण आहे. मानवी क्रियाकलापांमुळे, विशेषत: कोळसा आणि तेलासारख्या जीवाश्म इंधनांचा वापर, जंगलतोड आणि कचऱ्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे. यामुळे कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड यांचे प्रमाण हवेत वाढले आहे, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. तज्ञ मंडळींच्या मते, “जागतिक स्तरावर शहरे हवामान बदलाच्या केंद्रस्थानी आहेत. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, अनियमित पर्जन्यमान, समुद्र पातळी वाढ आणि पूर यांची तीव्रता सतत वाढत आहे.” त्यात महाराष्ट्रात सारखे झपाट्याने शहरीकरण होणारे राज्य देशातील आणि जगातील इतर राज्यांप्रमाणे डुंबले नाही तरच नवल. हवामानशास्त्रज्ञ सांगत आहेत की, समुद्राच्या पातळीत वाढ आणि अनियमित पावसामुळे भारतातील कृषी, पाणी आणि जैवविविधता यावर गंभीर परिणाम होत आहेत. गेल्या दशकात महाराष्ट्रात उष्ण दिवस दुप्पट, दुष्काळ तिप्पट आणि पूर चारपट झाले आहेत. तज्ञ पंजाबराव डख यांनी 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता, जो खरा ठरला. त्यांनी शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
उपाययोजना व भविष्यकालीन दृष्टिकोन काय?
महाराष्ट्राने ‘स्टेट कूलिंग अॅक्शन प्लॅन’ सुरू केला असून, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तज्ञांनी शाश्वत विकास, जल आत्मनिर्भरता आणि हवामान बदलावरील उपाययोजनांवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. सीओपी-29 परिषदेतही हवामान बदलामुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर चिंता व्यक्त करण्यात आली. ही राज्याच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे. राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. पाण्याचा निचरा, गाळाने भरलेल्या नद्या आणि तलावांची स्वच्छता आणि हरित ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य हवामान अंदाज आणि विमा योजनांद्वारे संरक्षण देणे आवश्यक आहे. हवामान बदल ही केवळ पर्यावरणीय समस्या नसून, ती मानवी जीवनावर थेट परिणाम करणारी सामाजिक आणि आर्थिक आपत्ती आहे. यावर मात करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. महाराष्ट्रासाठी ती अधिक महत्त्वाची आहे. रोज उठून राजकारणात डुंबलेले सर्व राजकारणी याकडे कधी लक्ष देणार आहेत? की फक्त पूर पर्यटनच करत राहणार? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
राज्याची शेती, जनजीवन, अर्थव्यवस्थेवर परिणाम
महाराष्ट्रातील सध्याची पूरपरिस्थिती आणि हवामान बदलाचे वाढते संकट यामुळे राज्यातील जनजीवन, शेती आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 25 जिह्यांनी या संकटाचा सामना केला आहे. तज्ञांचे मत आहे की, हवामान बदलामुळे अशा तीव्र घटनांची वारंवारिता आणि तीव्रता वाढत आहे. यावर मात करण्यासाठी शाश्वत उपाययोजना आणि सामूहिक कृती आवश्यक आहे. राजकीय गदारोळात गुंतलेला महाराष्ट्र आपल्यावरील या संकटावर उपाय योजनेसाठी चकार शब्द काढत नाही आणि नेते, प्रशासकीय व्यवस्थाही त्यावर भाष्य करून ठोस उपाययोजना सुरू करत नाही. त्यामुळे प्रतिवर्षाची मलमपट्टी महाराष्ट्राचे हे दुखणे बळवण्यातच भर घालत आहे. उपाय प्रत्यक्षात उतरत नाहीत आणि त्याचा फटका बसणारी जनता त्याबद्दल आजही अनभिज्ञ आणि त्यामुळे गप्प आहे हे सर्वात खुपणारे आहे.
शिवराज काटकर








