शांतता कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ३८ गावांमध्ये डॉल्बी वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणताही व्यक्ती डॉल्बीचा वापर करताना आढळल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहा. पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ही माहिती दिली. बैठकीस माजी सभापती अप्पाराव कोरे, सिद्धेश्वर बाजार समितीचे माजी संचालक पिराप्पा म्हेत्रे, अॅड. राजेश देशमुख, माजी सरपंच रमेश नवले, गौरीशंकर मेंडगुदले, यासीन मकानदार, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील, मोतीराम चव्हाण, सचिन फडतरे, सचिन साठे, बिलाल शेख, दानिश शेख, मुबारक मोमीन, अप्पासाहेब व्हनमाने, म्हाळप्पा हेळकर, सुनील व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार यांनी सांगितले की, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे राज्यभरात आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांच्या कानांचे पडदे फाटले असून त्यांना कायमस्वरूपी ऐकू येणे बंद झाले आहे. डॉल्बीमुळे काही व्यक्तींना हृदयविकाराचे झटके देखील आले आहेत. ग्रामीण भागातील माती व पत्र्याची घरे डॉल्बीच्या तीव्र आवाजामुळे हादरून कोसळल्याचेही उदाहरणे आहेत.
न्यायालयाने डीजे वापरावर बंदी घातली आहे. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक ठिकाणी पोलीस डीजे मुक्त उत्सव राबवू शकले नाहीत, असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले.








