12 सप्टेंबरपर्यंत मुदत : परिवहन खात्याचा आदेश
बेंगळूर : वाहतूक विभागाने वाहनधारकांना दंड भरण्यासाठी पुन्हा एकदा सवलत जाहीर केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड न भरलेल्या वाहनधारकांना दंडात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. 23 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत दंड भरणाऱ्यांनाच ही सवलत मिळणार आहे. यासंबंधी राज्य परिवहन खात्याच्या अप्पर सचिव पुष्पा व्ही. एस. यांनी अधिकृत आदेश जारी केला आहे. दंडातील 50 टक्के सवलत ही 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत दाखल झालेल्या प्रकरणांना लागू असेल. 12 फेब्रुवारी 2023 नंतरच्या प्रकरणांना ही संधी लागू राहणार नाही. वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी अनेक वर्षांपासून दंड न भरलेल्यांसाठी हा आदेश अनुकूल आहे. 12 फेब्रुवारी 2023 नंतरच्या प्रकरणांसाठी पुढीलवर्षी दंडात सवलत जाहीर होण्याची शक्यता आहे.
दंड कसा भरायचा?
वाहन मालकांनी त्यांच्या वाहनावर वाहतूक नियम उल्लंघनाचे प्रकरण नोंद झाले आहे का, याची ऑनलाईन पडताळणी करावी. कोणत्या वाहतूक नियमाचे उल्लंघन झाले आहे, तारीख व वेळेसह त्या ठिकाणाचा फोटो ऑनलाईन उपलब्ध होतो. थकीत दंड भरण्यासाठी पोलीस विभागाने शहरात विशेष व्यवस्था केली आहे. कर्नाटक वन, बेंगळूर वन केंद्रांमध्येही माहिती मिळवून दंड भरता येईल. पेटीएमद्वारेही दंड भरण्याची सुविधा आहे. वाहतूक पोलीस स्थानकाला वाहन नोंदणी क्रमांक देऊन माहिती मिळवूनदेखील दंड भरता येऊ शकतो. कर्नाटक राज्य पोलीस खात्याच्या वाहतूक ई-चलनमध्ये नोंदविलेल्या प्रकरणांसाठीच थकीत दंडाच्या रकमेवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे.









