बेळगाव : महानगरपालिकेने नियुक्ती केलेल्या नव्या शहर स्वच्छता ठेकेदाराकडून घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील इतरत्र कचरा न टाकता घंटागाडीकडेच कचरा द्यावा, असे आवाहन केले जात आहे. नागरिकांतूनही याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने दररोज 90 हून अधिक कामगारांची बचत होत असल्याने सदर मनुष्यबळ गटार स्वच्छता व इतर कामांसाठी महापालिकेकडून वापरले जात आहे.
घनकचरा कायदा 2016 नुसार केरकचरा नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या घंटागाडीकडे देणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील गणेश शंकर या ठेकेदाराला 1 ऑगस्टपासून देण्यात आला आहे. तेव्हापासून कचऱ्याची उचल व विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. रात्री तसेच दिवसा कचऱ्याची उचल करण्यात येत आहे.
ब्लॅकस्पॉट तयार होऊ नयेत, यासाठी सफाई कर्मचारी घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी कचऱ्याची उचल करत आहेत. याबाबत नागरिकांनाही सूचना करण्यासह जनजागृती केली जात आहे. सफाई ठेकेदाराकडून एका कचरा गाडीवर एक चालक व एक सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दररोज 90 कामगारांची बचत होत असून हे मनुष्यबळ शहरातील गटारी व इतर कामांसाठी वापरले जात आहे, असे मनपा साहाय्यक पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.









