अॅक्सिओम-4 मोहिमेवरून परतलेल्या अंतराळवीर शुभांशू शुक्लाचे अनुभवकथन : दिल्लीतील संवादात अनेक बाबींवर प्रकाशझोत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अॅक्सिओम-4 मोहिमेबद्दल भारत सरकार, इस्रो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. भारतात परतल्यानंतर त्यांनी गुरुवारी आपले अनुभव व विचार व्यक्त करताना भारत अजूनही अवकाशातून सर्वोत्तम म्हणजेच ‘सारे जहाँ से अच्छा…’ दिसत असल्याचेही स्पष्ट केले. याचदरम्यान पत्रकार परिषदेत इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी गेल्या 10 वर्षात झालेल्या प्रगती आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अवकाश क्षेत्र कसे विकसित झाले आहे हे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी नासा-इस्रोच्या सहकार्यावर आणि खासगी कंपन्यांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.
दिल्लीतील मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आपल्या अवकाश मोहिमेतील अनुभव विषद केले. याप्रसंगी सुरुवातीलाच त्यांनी फाल्कन 9 वाहनावरून उ•ाण करण्याची संधी मिळाल्याबद्दल भारत सरकार, इस्रो आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो असे सांगितले. या मोहिमेत माझी भूमिका मिशन पायलटची होती. क्रू ड्रॅगनमध्ये चार जागा आहेत. मी मिशन पायलट होतो आणि कमांडरसोबत काम करायचे होते आणि क्रू ड्रॅगनच्या सिस्टीमशी संवाद साधायचा होता. तसेच आम्हाला भारतीय संशोधकांनी सांगितलेले प्रयोगही करायचे होते. तसेच प्रात्यक्षिके, छायाचित्रे आणि व्हिडिओग्राफ देखील टिपायचे होते. मला देण्यात आलेले हे सर्व काम यशस्वीपणे पूर्ण झाल्याने आपण पूर्ण समाधानी असल्याचे शुभांशू यांनी सांगितले.
अंतराळ मोहीम भीतीदायक पण टीमचे पाठबळ मोठे!
अंतराळ मोहिमेत आपल्याला भीती वाटत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. सर्वांना भीती वाटते पण आपल्या मागे एक विश्वासू टीम असते ज्याच्यावर आपण आपले जीवन सोपवतो. या मोहिमेत माझ्या पाठीशी भक्कम आणि विश्वासू टीम असल्यामुळे हे आव्हान मी लीलया पेलले, असे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला म्हणाले. अॅक्सिओम मोहीम अंतर्गत आम्ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दोन आठवडे राहिलो. मी मिशन पायलट होतो, मी कमांडर होतो, मी सिस्टमचे नेतृत्व करत होतो. तेथे दोन आठवडे आम्ही अनेक प्रयोग केले. काही फोटो काढले. यासाठी आम्ही अनेक महिने प्रशिक्षणही घेतले. हा एक वेगळा अनुभव होता, असेही शुक्ला यांनी सांगितले.
मिळालेले ज्ञान अमूल्य!
मानवी अंतराळ मोहीम राबविण्याचा फायदा केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नाही. तिथे राहून आपल्याला मिळणारे अतिरिक्त ज्ञान अमूल्य आहे. गेल्या एका वर्षात मी गोळा केलेली सर्व माहिती आपल्या स्वत:च्या मोहिमांसाठी गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानकासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा आशावादही शुभांशू शुक्ला यांनी व्यक्त केला. लवकरच आपण आपल्या कॅप्सूलमध्ये, रॉकेटमध्ये आणि पृथ्वीवरून एखाद्याला अवकाशात पाठवू. हा अनुभव जमिनीवर शिकलेल्या अनुभवांपेक्षा खूप वेगळा आहे. शरीरात अनेक बदल होतात. 20 दिवस अंतराळात घालवल्यानंतर, शरीर गुरुत्वाकर्षणात जगणे विसरते, असेही त्यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये पहिली गगनयान चाचणी मोहीम
लवकरच भारत रॉकेट आणि कॅप्सूलसह अंतराळवीरांना अंतराळात पाठवेल. त्यादृष्टीने इस्रो डिसेंबरपर्यंत पहिली गगनयान चाचणी मोहीम सुरू करेल, असे संकेतही देण्यात आले. शुभांशू शुक्ला यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेबद्दल माहिती दिली. इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्या अंतर्गत 2027 मध्ये भारतीय हवाई दलाचे तीन वैमानिक अंतराळात पाठवले जातील. हे वैमानिक पृथ्वीच्या कक्षेत तीन दिवस 400 किलोमीटर उंचीवर राहतील आणि त्यानंतर हिंदी महासागरात सुरक्षित लँडिंग केले जाईल. या मोहिमेचा एकूण खर्च सुमारे 20,193 कोटी रुपये आहे. गगनयानच्या तयारीसाठी पहिल्या दोन रिकाम्या चाचणी उ•ाणे पाठवल्या जातील, त्यानंतर एका उ•ाणात एक रोबोट पाठवला जाईल. हे सर्व यशस्वी झाल्यावर मानवाला अवकाशात पाठवले जाईल, असेही सांगण्यात आले.









