सखल भागात पावसाचे पाणी तुंबून : महाराष्ट्र-गोव्यातील ग्राहक खरेदीसाठी बेळगावात होताहेत दाखल
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी काही प्रमाणात उघडीप दिली. तब्बल चार दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले. पावसाचा जोर ओसरल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोवा येथील गणेशभक्तही खरेदीसाठी बेळगावात दाखल होऊ लागल्याने बाजारपेठेत उलाढाल वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले असल्याने पोलिसांनी वाहतूक नियमन करावे, अशी मागणी केली जात आहे. रविवारपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. हवेत गारठा निर्माण झाला असल्याने नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. मात्र, बुधवारी सकाळपासून काही प्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. दुपारी चारच्या दरम्यान सूर्यदर्शनदेखील झाले. मात्र, सखल भागात अद्यापही पाणी तुंबून आहे. गणेशोत्सव केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना पावसामुळे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांची मंडप उभारण्याची कामे ठप्प झाली आहेत. बेळगावातील गणेश मंडळांकडून आकर्षक श्रीमूर्ती प्रतिष्ठापना करण्यासह देखावे सादर केले जातात. पण यंदा पावसामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर संकट ओढावल्याचे दिसून येत आहे.
वाहतुकीबाबत नियोजन गरजेचे
विविध साहित्य खरेदी करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र आणि गोवा येथील ग्राहक बेळगावात येत असतात. मात्र, यंदा पावसाचा जोर कायम असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. पण बुधवारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. वाहनचालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. याकडे रहदारी पोलिसांनी लक्ष घालून वाहतूक समस्या उद्भवू नये यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.









