किल्ला-क्लब रोड येथील वाहतूक ठप्प
बेळगाव : मुसळधार पावसामुळे शहरात झाडे, तसेच फांद्या कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. बुधवारी सकाळी किल्ला व क्लब रोड येथे झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वीजवाहिन्या व खांबांचे नुकसान झाले असून काहीकाळ रस्ता बंद ठेवावा लागला होता. बुधवारी सकाळी क्लब रोड येथील जीएसटी कार्यालयासमोरील एक जुनाट वृक्ष कोसळला. मुख्य रस्त्यावर वृक्ष कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने हा वृक्ष रस्त्यावर कोसळला. अन्यथा आजूबाजूचे घरे, तसेच कार्यालयाचे नुकसान झाले असते. वनविभागाच्या परवानगीनंतर हा वृक्ष हटविण्याचे काम सुरू झाले. परंतु वृक्ष मोठा असल्यामुळे दुपारपर्यंत काम सुरूच होते. त्यामुळे ही सर्व वाहतूक विश्वेश्वरय्यानगरमार्गे वळविण्यात आली होती.
किल्ला येथे झाड कोसळून नुकसान
किल्ला येथे मागील दोन दिवसांत दोन ते तीन झाडे कोसळली आहेत. मंगळवारी एक जुनाट वृक्ष कोसळला. त्यापाठोपाठ बुधवारी सकाळी पुन्हा एक वृक्ष कोसळण्याची घटना घडली. वनविभागाकडून झाडे तोडण्यास आडकाठी आणली जात असल्याने वृक्ष कोसळून हेस्कॉमचे नुकसान होत आहे. वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा बऱ्याच काळासाठी बंद करावा लागत आहे. त्यामुळे धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.









