बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगावच्यावतीने 17 ते 19 ऑगस्टपर्यंत मराठा मंदिर येथे घेण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धेतील पहिला क्रमांक महिला गटात मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी आणि पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ, अडकूर, ता. चंदगड यांनी पटकावून प्रत्येकी 15 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह मिळविले. मंगळवारी सायंकाळी सर्व विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रा. पी. डी. पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाह सुनीता मोहिते, संचालक अभय याळगी, लता पाटील, रघुनाथ बांडगी, प्रसन्न हेरेकर व नेताजी जाधव आदी उपस्थित होते.
अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा सन्मान डॉ. गायकवाड यांनी केला तर वक्त्यांचा सन्मान अनंत लाड यांनी केला. ‘संत साहित्य व समाज प्रबोधन’ या विषयावर बोलताना प्रा. पी. डी. पाटील यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘आपण अनेक देवी-देवतांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करतो, पण विठ्ठलाची जयंती किंवा पुण्यतिथी कधीच साजरी करीत नाही. तसेच प्रत्येक देवी-देवतांच्या हातात एखादे शस्त्र असते. मात्र, विठुरायाच्या हातात कोणतेच शस्त्र नसते. तुम्ही आंधळ्याप्रमाणे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही गोष्टीची सत्यता पडताळून पाहून मगच त्यावर विश्वास ठेवा,’ असे आवाहन केले. अप्पासाहेब गुरव यांनी सर्व मंडळांना तसेच वाचनालयाला या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
महिला गट- 1) मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, 2) सद्गुरु भजनी मंडळ, 3) ओमकार महिला भजनी मंडळ, 4) जय हरी महिला भजनी मंडळ, 5) श्री मंगाई महिला भजनी मंडळ, 6) भक्ती सांस्कृतिक महिला भजनी मंडळ, 7) संत मुक्ताई महिला भजनी मंडळ, 8) ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, 9) स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ व उत्तेजनार्थ पंचराशी महिला भजनी मंडळ.









