गटारींसह सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव शहरातील निझामियानगर दुसरा क्रॉस, धामणे रोड वडगाव परिसरात गटारीची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरासमोर दीड ते दोन फूट पाणी साचत असून राहिवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे. रहिवाशांच्या मते, गेल्या 10-12 वर्षांपासून परिसरात राहणाऱ्यांना निचऱ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे रोगराईचा धोका वाढत आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालून गटारी व सांडपाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही काहींनी दिला आहे.









