सांगली :
कृष्णामाई स्विमिंग अँड ट्रेकर्स ग्रुप, श्री स्वामी समर्थ जलतरण सदस्य, डॉक्टर सरकार ग्रुप आणि कृष्णामाई स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाई घाट (स्वामी समर्थ मंदिर) ते हरिपूर संगमेश्वर मंदिरदरम्यान ६ किमी भगवा जलतरण रॅली पार पडली.
या उपक्रमात ७० ते ७५ जलतरणपटूंनी भाग घेतला. सर्व वयोगटातील जलतरणपटूंनी ४५ मिनिटांत अंतर पार करत महादेवाच्या दर्शनासाठी संगमेश्वर मंदिर गाठले. ३५ फूट पाणीपातळी व प्रवाहाचा वेग असूनही जलतरणपटूंनी दाखवलेले धैर्य व कौशल्य लक्षणीय होते.
या रॅलीतून युवकांमध्ये धैर्य, शिस्त, संघटनशक्ती आणि शिवभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याबरोबरच जलतरण क्रीडेला चालना देण्याचा उद्देश होता. नदी संवर्धन व स्वच्छतेचाही संदेश दिला गेला.
सांगलीकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, जलतरणासोबतच सामाजिक बांधिलकीही या माध्यमातून अधोरेखित झाली.








