वृत्तसंस्था / चेन्नई
दुर्लक्षित असलेला भारतीय फलंदाज पृथ्वी शॉने मंगळवारी चेन्नई येथे झालेल्या छत्तीसगडविऊद्धच्या बुची बाबू करंडक स्पर्धेतील सामन्यात पदार्पणातच शानदार शतक झळकावून महाराष्ट्रासाठी आपल्या कारकिर्दीची सुऊवात केली. शॉने पहिल्या डावात 122 चेंडूत शतक झळकावले. यामध्ये 14 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता.
महाराष्ट्राने एका टप्प्यावर केवळ 15 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 25 वषीय शॉने उत्तम खेळी केली. शॉ आणि सचिन धस यांच्यात 71 धावांची सलामी भागीदारी झाली होती. यानंतर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड आणि अंकित बावणे लगेचच बाद झाले. यानंतर शॉने सिद्धार्थ म्हात्रेसोबत पाचव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचून डाव सावरला. शतक पूर्ण केल्यानंतर, शॉने शांतपणे बॅट उचलली आणि दुसऱ्या टोकाकडे जाऊन त्याच्या जोडीदाराला मिठी मारली. शॉने 141 चेंडूत 111 धावा केल्या आणि लेग-स्पिनर शुभम अग्रवालच्या गोलंदाजीवर तो यष्टिचीत झाला. पहिल्या दिवशी छत्तीसगडने 89.3 षटकांत 252 धावा केल्या होत्या.
शॉने यापूर्वी आपली कारकीर्द पुन्हा जिवंत करण्यासाठी मुंबई सोडून महाराष्ट्र संघात प्रवेश केला होता. अंडर-19 विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर आणि कसोटी पदार्पणातच शतक झळकावल्यानंतर एकेकाळी भारताचा भविष्यातील स्टार म्हणून ओळखला जाणारा शॉ या वर्षाच्या सुऊवातीला त्याच्या फॉर्म आणि तंदुऊस्तीबद्दलच्या चिंतेमुळे बाजूला पडला होता. नंतर महाराष्ट्रात सामील झाला होण्याचा निर्णय त्याने घेतला.
गेल्या हंगामात त्याला मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून वगळण्यात आले होते आणि विजय हजारे ट्रॉफी मोहिमेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. डिसेंबरमध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 साठी तो मुंबई संघाचा भाग असला तरी, त्याने फलंदाजी करताना केवळ 197 धावा केल्या होत्या. शॉने शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये भारतासाठी खेळला होता आणि गेल्या वषीच्या आयपीएल लिलावात तो त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अनसोल्ड राहिला होता..









