‘गँगवॉर’ हा प्रकार तसा गोव्यात नवीन नाही. यापूर्वीही गोव्यात गँगवॉरची नोंद झालेली आहे. परंतु हल्ली ज्या घटना घडू लागल्या आहेत. त्या पाहता शांततामय गोव्यात, अशांतता निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलिस यंत्रणेने कोणत्याही दडपणाविना आता गँगवॉरचे कंबरडे मोडून काढणे आवश्यक आहे.
गेल्या मंगळवारी जे गँगवॉर मडगाव-कोलवा रोडवरील मुंगुल भागात झाले, त्यात गोव्यातील विविध भागातील युवक गुंतल्याने त्याची गांभीर्यता अधिक वाढली. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी मडगावला भेट देत आपण असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. यावरूनच या प्रकरणाचे गांभीर्य सहज लक्षात येण्याजोगे आहे.
मुंगुल येथे गेल्या मंगळवारी पहाटे झालेल्या गँगवॉरमध्ये दोन तरुण जखमी झाले. या गँगवॉरमध्ये तलवारी, काठ्या आणि बंदुकीचा वापर करण्यात आल्याने दक्षिण गोव्यात हिंसाचार आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गँगवॉरची तयारी बऱ्याच दिवसांच्या आधी झाली असावी, याला काही प्रमाणात पुष्टी मिळत आहे. या गँगवॉरमुळे गोव्याच्या ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल जनतेत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
रफिक ताशन (24) आणि युवकेश सिंग (20) या दोन तरुणांवर काहीजणांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी दोन गटात पूर्वीपासून दुश्मनी होती, असे माहितीतून कळते आहे. त्यातूनच हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. यातील काहीजण हे ‘ड्रग्ज’च्या व्यवसायात गुंतल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. अर्थात पुढील तपासातून याबाबतची अधिकची माहिती पुढे येणार आहे.
हल्ला करणाऱ्यांपैकी चार-पाच जणांची रफिक ताशन व युवकेश सिंग यांनी ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी तातडीने ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली. पोलिस एवढ्या घाईगडबडीत ‘लुक आऊट’ नोटीस जारी करीत नाहीत मात्र या गँगवॉरमध्ये पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली व सायंकाळपर्यंत तीन-चार जणांना ताब्यात घेतले. या गँगवॉरमध्ये सुमारे वीस जणांचा सहभाग असावा, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अटक सत्र तीव्र करीत आतापर्यंत अन्य 18 जणांना ताब्यात घेतले. प्रत्यक्ष हल्ला करण्यात गुंतलेल्यांच्या संपर्कात असलेल्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुरुवातीला ओळख पटविलेल्या चार-पाच हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आणि नंतर त्यांना तलवारी आणि काठ्यांनी मारहाण केली. यावेळी रफिक ताशन आणि युवकेश सिंग यांनी आपल्या कारचे दरवाजे लॉक केल्याने त्याच्या कारची नासधूस करण्यात आली व त्यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडल्या. पोलिसांची विविध पथके स्थापन करून प्राणघातक हल्ला करण्यात गुंतलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली व 18 जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात अजून काहीजणांना अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजकीय आशीर्वाद लाभलेल्या एका युवकाचाही समावेश आहे.
या प्रकरणात एका आरोपीला पोलिस ताब्यात घेण्यासाठी गेले असता, त्याच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. एका महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी तीन-चार महिलांनाही ताब्यात घेतले.
या गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर नाकेरी-बेतूल येथे पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्ती झारखंडच्या होत्या. वास्कोतही पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे स्पष्ट होत आहे.
बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी मडगावात एका क्षुल्लक कारणावरून एका युवकावर दहा ते पंधरा जणांनी हल्ला चढविला. या युवकांना एका राजकीय व्यक्तीचा आशीर्वाद असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाने मडगावच्या अर्बन हेल्थ सेंटरमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी आत घुसून त्याला जबर मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या युवकाला रुग्णवाहिकेत घातले जात असताना पोलिसांच्या समक्षच पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.
हे सर्व प्रकार पाहता पोलिसांची भीती आता कुणालाच राहिलेली नाही, हे या गंभीर घटनेवरुन स्पष्ट होत आहे. गँगवॉर असो किंवा अन्य घटना, यात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. तेव्हाच काही प्रमाणात गुन्हेगारांवर नियंत्रण येऊ शकते. पोलिसांनी कोणत्याही दडपणाखाली न येता कारवाई करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
राजकीय व्यक्तींनीही गुन्हेगारांना राजकीय कवच पुरविण्याचे आता बंद करण्याची वेळ आलेली आहे. गोव्यात अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या सर्वांचा बिमोड हा योग्यपणे व्हायलाच हवा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री या नात्याने पोलिसांना तशी मोकळीक देणे आवश्यक आहे.
गोव्याची खरी ओळख संपली आहे आणि आपली संस्कृती नरसंहाराला बळी पडली आहे. असे होता कामा नये. गोव्यातील शांततापूर्ण जीवनशैली अबाधित ठेवणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. मतपेटीवर डोळा ठेऊन अशा गुन्हेगारांना वाचवण्याचे प्रकार यापुढेतरी बंद व्हायला पाहिजेत. पोलीस प्रशासनाचा वचक गुन्हेगारांवर सैल झाल्यास कायदा सुव्यवस्था आणखी कमकुवत होण्यास वेळ लागणार नाही. घडलेल्या घटनेची गंभीर दखल पोलीस व प्रशासन स्तरावर घेतली जायला हवी व योग्य ती कारवाई होणेही तितकेच आवश्यक असणार आहे.
महेश कोनेकर








