बोरगाव :
वाळवा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदीच्या पूरप्रवण भागात राहणाऱ्या अंदाजे २० ते २२ कुटुंबांना ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीच्यावतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
बहे परिसरातील मोहिते गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आणि रामोशी वसाहत येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या पडणारा जोरदार पाऊस आणि कोयना धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. परिणामी, परिसरात पुराची धास्ती निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीच्या वतीने नदीकाठावरील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू आहे. हे स्थलांतर गावातील जिल्हा परिषद शाळा, बहे सोसायटी हॉल, आणि बहे हायस्कूल येथे करण्यात येत आहे.
या आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर व्यवस्थापनासाठी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील, लोकनियुक्त सरपंच संतोष दमामे, उपसरपंच दिलीप देशमुख, तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत.
- नदीकाठच्या नागरिकांनी घाबरू नये
“नदीकाठच्या नागरिकांनी घाबरू नये. अजून दोन-तीन फूट पाणी वाढेल, त्यानंतर पाणीपातळी स्थिर होऊन कमी होईल. तरीसुद्धा नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.”
-संदीप घुगे, जिल्हा पोलीस प्रमुख, सांगली








