कराड :
कराड-विटा रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारी युवती तिच्या मैत्रिणींसोबत पायी चालत वसतिगृहाकडे निघालेली असताना आलीशान कारमधून आलेल्या तिघांनी भरदिवसा तिचे अपहरण केले. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अपहृत युवतीच्या शोधासह संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके पुणे, मुंबईसह ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.
पांडुरंग साळुंखे (रा. जावळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यासह अन्य दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील एक युवती कराड शहरा नजिकच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संबंधित दुपारी तिच्या युवती सोमवारी मैत्रिणींसमवेत महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे पायी चालत निघाली होती. त्यावेळी महाविद्यालयाच्या आवारात थांबलेल्या कारमधून एक युवक खाली उतरला. संबंधित युवती कारजवळ येताच संशयिताने तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. युवतीने नकार देताच त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये ढकलले. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या दुसऱ्या युवकाने तिला ओढत कारमध्ये घेतले. त्यानंतर संशयित तेथून पसार झाले.
या घटनेने घाबरलेल्या मैत्रिणींनी तातडीने याबाबतची माहिती महिला प्राध्यापकांना दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळविले. प्राचार्यांनी युवतींच्या मैत्रिणींसह कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. अपहृत युवतीचा शोध घेण्यासाठी तसेच संशयितांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्यासह पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत संशयित पोलिसांच्या हाती लागले नव्हते.








