खेड :
गणेशोत्सव 8 दिवसांवर येवून ठेपला आहे. या उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासासाठी 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गावी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे. महामार्गाचे 90 ते 95 टक्के काम पूर्ण केल्याचा दावा केला जात असला तरी अजूनही चाकरमान्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. 18 वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाबाबत आजवर देण्यात आलेल्या ‘डेडलाईन’ही हुकल्या आहेत. महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे यंदाही गणेशभक्तांना अनेक अडथळे पार करत गाव गाठावे लागणार आहे.
गणेशभक्तांच्या मार्गात अवजड वाहतुकीच्या वाहनांचाही ‘स्पीडब्रेकर’ उभा ठाकत असतो. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी 23 ते 29 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून 15 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
गणरायासह गौरी विसर्जन झाल्यानंतर परतीच्या प्रवासात 2 ते 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत तर 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत रात्री 8 वाजेपर्यंत महामार्गावर अवजड वाहतुकीला ‘ब्रेक’ लावण्यात येणार आहे. दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, रसायन मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशिवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.








