वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
शनिवारपासून सुरू असलेल्या मघा नक्षत्राच्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे कंग्राळी खुर्द-अलतगा गावाजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला यावर्षी चौथ्यांदा पूर आला आहे. मार्कंडेय नदीकाठ शिवार परिसरात तिसऱ्यांदा लागवड केलेले भातरोपही कुजून जाण्याची चिंता शेतकरीवर्गाला लागली आहे. परिणामी शेतकऱ्यांना परत लागवड करण्यासाठी रोप उपलब्ध नसल्यामुळे नदीकाठ शिवार ओस पडणार की काय? अशी चिंता भेडसावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर्षी अवकाळी पावसापाठोपाठ सर्वच नक्षत्रांनी भरपूर पाऊस पाडल्यामुळे सकल भागातील भातरोप लागवडीला पाऊस वरदान ठरला आहे. परंतु मार्कंडेय नदीकाठावरील शेतकरीवर्गाला हा पाऊस मारक ठरल्यामुळे तीनवेळा भातरोप लागवड करावी लागली. आता चौथ्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठ परिसर शिवारातील भातरोप कुजण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
नदीला नाल्याचे स्वरूप
मार्कंडेय नदीचे पात्र पाहिले तर एखाद्या नाल्याच्या पात्राप्रमाणे झाले आहे. याला प्रशासन की शेतकरीवर्ग जबाबदार अशीही चर्चा होत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी मार्कंडेय नदी बचाव या मोहिमेच्या माध्यमातून 20 कोटी रुपये खर्चातून शासनाने नदीचे पात्र वाढविणे व खोली वाढविण्यासाठी मोहीम आखून काम केले. परंतु सध्या मार्कंडेय नदीचे पात्र म्हणजे एखाद्या लहान नाल्याप्रमाणे झाले आहे. यामुळे थोडासा जरी पाऊस पडला की पाणी पात्राबाहेर जाऊन नदीकाठावरील पिके पाण्याखाली जात आहेत. तेव्हा संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी नदी पात्राचा सर्व्हे करून नदीपात्राची रुंदी वाढवून वारंवार पूर येण्याची परिस्थिती थांबवून शेतकरीवर्गाला दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.









