23 ऑगस्टला ठोठावणार शिक्षा : सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेल्या गौंडवाड येथील सतीश पाटील (वय 30) या तरुणाच्या खून खटल्यात दहा जणांवरील आरोप निश्चित झाल्याने मंगळवारी द्वितीय जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. त्यामुळे शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी आरोपींना शिक्षा ठोठावली जाणार आहे. गौंडवाड येथे गेल्या काही वर्षांपासून देवस्थानच्या जागेवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन काहीजणांनी सतीश पाटील या तरुणाचा खून केला होता. या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इतकेच नव्हेतर वाहनांची जाळपोळही झाली होती. तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. त्याचबरोबर काही दिवस गावात पोलीस तळ ठोकून होते. सतीश पाटील यांच्या अंत्यविधीवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करून 25 जणांविरोधात न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी द्वितीय जिल्हासत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात सरकारी वकिलांना मदत म्हणून अॅड. शामसुंदर पत्तार यांनी वकालत दाखल केली होती. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अनेक साक्षी, पुरावे तपासण्यासह युक्तिवाद करण्यात आल्याने आरोपी क्रमांक 1 ते 5 यांच्यावर भा.दं.वि. कलम 302 नुसार तर 6 ते 10 आरोपींवर भा.दं.वि. कलम 324 नुसार आरोप निश्चित झाल्याने न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. तर उर्वरित संशयितांना यातून वगळण्यात आले आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार असून त्यादिवशी आरोपींना शिक्षा ठोठावली जाणार आहे.









