जागतिक बाजारात मंदी असून भारतीय बाजारात उत्साह
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवड्यात दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचा कल राहिला आहे. दरम्यान जागतिक बाजारात नकारात्मक संकेत असूनही, भारतीय शेअर बाजार मजबूत होत बंद झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी सलग चौथ्या व्यापार सत्रात वाढ नोंदवली. जिओच्या शुल्क वाढीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागामध्ये वाढ आणि निवडक ऑटो क्षेत्रामध्ये खरेदीमुळे बाजाराला मजबुतता प्राप्त झाली. दरम्यान, गुंतवणूकदार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेचा आणि युरोपीय नेत्यांशी झालेल्या चर्चेचा अंदाज घेत आहेत.
बीएसई सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 81,319 वर उघडला. व्यवहारादरम्यान अखेर 370.64 अंकांनी वाढून 81,644.39 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी अखेर 103.70 अंकांनी किंवा 0.42 टक्क्यांनी वाढून 24,980.65 वर बंद झाला. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, रशिया आणि युक्रेनमधील भू-राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे देखील आशावादात भर घालत आहेत. तथापि, अमेरिका-भारत व्यापार चर्चेत अधिक स्पष्टता येईपर्यंत ही तेजी कायम राहील का हे पाहावे लागेल.
सेन्सेक्स शेअर्समध्ये, टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक 3.5 टक्क्यांनी वाढलेले होते. अदानी पोर्ट्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनीही प्रत्येकी 3 टक्के वाढ नोंदवली. दुसरीकडे, बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. यासोबतच पॉवर ग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचडीएफसी बँक आणि एल अँड टी यांचे शेअर्स घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यानी वाढून बंद झाले. क्षेत्रीय आघाडीवर, बीएसई ऑटो, एनर्जी, ऑइल अँड गॅस आणि टेलिकॉम निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले होते.








