भारतात निर्मिती करण्याचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ मॉस्को
भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण सहकार्य दशकांपेक्षा जुने आहे. सोव्हियत काळापासूनच भारताने रशियाकडुन लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रs आणि रणगाडे मिळविले आहेत. टी-90 भीष्म याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. टी-90 भीष्म या रणगाड्याची तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारतातच निर्मिती करण्यात आली आहे. आता रशियाने भारताला स्वत:चा सर्वात आधुनिक रणगाडा टी-14 आर्मटा पुरविण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाने केवळ पुरवठ्याचा प्रस्ताव ठेवला नसून तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतातच निर्मितीची ऑफर दिली आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण निर्मितीला नवी उंची मिळू शकते.
नेक्स्ट जनरेशन वॉर मशीन
टी-14 आर्मटाला रशियाचा सर्वात अत्याधुनिक रणगाडा मानले जाते. यात स्टील्थ डिझाइन, मानवरहित ऑपरेशन आणि 125 एमएम 2ए82-1एम स्मूथबोर गन यासारखी वैशिष्ट्यो सामील आहेत, या रणगाडयात 1500 एचपी इंजिन असून ते पर्वतीय भाग आणि वाळवंटी भागात उपयुक्त ठरणार आहे. रणगाड्यात निर्देशित क्षेपणास्त्र असून ते 8 किलोमीटरपर्यंत अचूक मारा करू शकते. यात डिजिटल बॅटल मॅनेजमेंट सिस्टीम आणि नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेयरची क्षमताही सामील आहे. सैनिकांच्या सुरक्षेसाठी याचा क्रू कॅप्सूल आर्मरने वेढलेला आहे. हा रणगाडा भविष्याच्या युद्धक्षेत्राच्या गरजा विचारात घेत डिझाइन करण्यात आला असल्याचा रशियाचा दावा आहे.
भारतासाठी संभाव्य वर्जन
भारताला मिळणारा टी-14 आर्मटा पूर्णपणे कस्टमाइज्ड असणार आहे. यात रशियाचे इंजिन नव्हे तर भारतात निर्मित डेट्रान-1500 एचपी इंजिन जोडण्यात येणार आहे. यामुळे पर्वतीय भागांमध्ये मोहीम राबविणे अधिक सोपे ठरणार आहे. याचबरोबर उत्पादन भारतात होणार असल्याने एका युनिटची किंमत सुमारे 10 कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. सध्या यासाठी अनुमानित खर्च 30-42 कोटी रुपये प्रतियुनिट असल्याचे सांगण्यात येते. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास भारताला अत्याधुनिक रणगाडे मिळण्यासोबत भविष्यात रणगाडे निर्मितीत आत्मनिर्भरताही प्राप्त होणार आहे.









