मान्सून सक्रिय : सांखळीत सर्वाधिक सव्वा पाच इंच पाऊस
पणजी : मान्सून अति सक्रिय झाल्यामुळे तसेच कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून गेल्या 24 तासात पावसाने गोव्याला झोपून काढले. सर्वाधिक सव्वा पाच इंच पावसाची नोंद सांखळी येथे नोंदविली. गेल्या 24 तासात सरासरी 4.15 इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमातील सरासरी पाऊस आता 93 इंच झाला आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी एलो अलर्ट जारी केले आहे आणि जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
रविवारी संपूर्ण गोव्यात मुसळधार पाऊस सुरू झाला तो सोमवारी सकाळीपर्यंत चालू होता. पणजीमध्ये दुपारी पावसाने विश्रांती घेतली. संपूर्ण गोव्यात ढगाळ आणि पावसाळी वातावरण असून हवेतील गारवा देखील वाढलेला आहे. गेल्या 24 तासातील मुसळधार पावसामुळे विविध भागातील नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक भागात छोट्या स्वरूपाचे पूर आले. म्हादई नदीचे पाणी वाढले. सांखळीच्या वाळवंटी नदीमध्ये देखील पाण्याचा जोर वाढला होता, मात्र पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्यानंतर पाणी ओसरले. तिथे पूरस्थिती निर्माण झाली होती.
पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर राहील. गणेशचतुर्थी एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे आणि पावसाचा वाढता जोर अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर परिणामकारक ठरत आहे विशेषत: बागायतदार आणि शेतकरी मंडळींवर तसे परिणाम संभवतात. रविवार ते सोमवार यादरम्यान साखळीत सव्वा पाच इंच, धारबांधवडा येथे सव्वा पाच इंच व मडगाव येथे देखील सव्वा पाच इंच पाऊस नोंदविला गेला. सांगे येथे साडेचार इंच, जुने गोवे येथे साडेचार इंच, वाळपई चार इंच, म्हापसा व पेडणे चार इंच, काणकोण आणि केपे येथे प्रत्येकी पावणे चार इंच पावसाची नोंद झाली. मुरगाव व दाभोळी येथे प्रत्येकी साडेतीन इंच तर पणजी मध्ये तीन इंच पावसाची नोंद झाली.









