सातारा :
गेल्या चोवीस तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटण, महाबळेश्वर, जावलीत मुसळधार पावसाने कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी रविवारी दीड फुटांवर उचलण्यात आलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे वाढवून सोमवारी प्रथम तीन फूट आणि नंतर रात्री 5 फुटावर उचलण्यात आले आहेत.
त्यामुळे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 35 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, कराड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. मात्र महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटक भरपावसात पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

कोयना पाणलोट क्षेत्रासहित संपूर्ण पाटण तालुक्यात स्वातंत्र्य दिनापासून पुन्हा धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून कोयना धरणात प्रतिसेकंद 45 हजार 82 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. दरम्यान धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी रविवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून धरणातून प्रतिसेकंद 12 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी पुन्हा सोमवारी सायंकाळी 4 वाजता कोयना धरणाचे दीड फुटांवर असणारे सहा वक्र दरवाजे आणखी वाढवून 3 फुटांवर तर रात्री 8 वाजता पुन्हा दरवाजे 5 फुटांवर उचलण्यात आले. परिणामी दरवाजामधून प्रतिसेकंद 33 हजार क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक असे मिळून एकूण 35 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयनानगर येथे 35 (3501) मिलिमीटर, नवजा येथे 57 (4176) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 67 (4116) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा 96.87 टीएमसी इतका झाला आहे.
- आणखी विसर्ग वाढणार
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा 96.87 टीएमसी आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणातील आवकही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पावसाचा पुन्हा जोर वाढल्यास धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणातील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता कोयना जलसिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली.








