नोकरी मिळवून बढती घेतली अन् निवडणूकही जिंकली : पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता
बेळगाव : महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने बनावट जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविली आहे. इतकेच नव्हेतर त्याच आधारावर त्याला बढतीही देण्यात आली आहे. हा प्रकार रविवार दि. 17 रोजी महापालिका कर्मचारी पतसंस्था निवडणुकीवेळी उघडकीस आला असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेत नाईट वॉचमन म्हणून नोकरी मिळविण्यासाठी एकाने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे. एसटी कोट्यातून संबंधित कर्मचाऱ्याला एसडीए पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे तो कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागात कार्यरत आहे. महापालिकेच्या सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत त्याने सहभाग घेऊन ‘ओबीसी ए’ मधून आपला अर्ज भरून निवडणूक लढविली.
एसटी कोट्यातून बढती देण्यात आलेला कर्मचारी ओबीसी ए मधून कसा काय निवडणुकीत उभा आहे? असा प्रश्न विरोधी पॅनेलमधील उमेदवारांना पडला. त्यामुळे कागदपत्रांची तपासणी केली असता तो कर्मचारी ओबीसी ए कॅटेगरीतील असल्याचे समोर आले. तसेच तो रविवारी झालेल्या निवडणुकीत विजयीदेखील झाला आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असल्याने महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून चौकशी हाती घेतली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एसटी कोट्यातून प्रमोशन मिळाल्यानंतर एसडीए पदासाठी आजपर्यंत घेतलेला पगारदेखील कपात केला जाण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हेतर बनावट जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होण्याचीही दाट शक्यता आहे. या प्रकाराची महापालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे.









