जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर आपत्कालीन उपचारांसाठी रेबीज लसींचा मुबलक साठा ठेवावा, तसेच कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी जि. पं. सभागृहात जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच प्रगतीबाबत मागे असलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना प्रगती करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या दृष्टी केंद्रांवर डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी पात्र लाभार्थींसाठी डोळे तपासणी शिबिर आयोजित केले पाहिजे. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर खासगी दंत महाविद्यालयांच्या सहकार्याने मोबाईल डेंटल व्हॅनचा वापर करून दंत उपचार शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही राहुल शिंदे यांनी केल्या आहेत.
वेळापत्रकानुसार लसीकरण करा
गेल्या दोन-चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात पाण्याशी संबंधित आजार वाढत असल्याने जनतेला उकळून पाणी पिण्याबाबत जागृती करावी, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता वेळापत्रकानुसार लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी जि. पं. उपसचिव बसवराज अडवीमठ, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आय. पी. गडाद, चिकोडी अप्पर आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. गडेद, जिल्हा शस्त्रचिकित्सक डॉ. केशव, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदणी देवडी, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. एस. एस. सायन्नवर, कुष्ठरोग नियंत्रणाधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा कीटक आधारित रोग नियंत्रणाधिकारी डॉ. विवेक होन्नळ्ळी, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी डॉ. संजय दोडमनी यांच्यासह टीएचओ, विविध खात्याचे अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर उपस्थित होते.









