गणेशोत्सवापूर्वी नेमणुकीची मागणी, साहाय्यक कार्यकारी अभियंतापद दीड महिन्यापासून रिक्त
बेळगाव : हेस्कॉमच्या शहर विभागात अनेक पदे रिक्त आहेत. शहर उपविभाग 2 मध्ये मागील दीड महिन्यांपासून साहाय्यक कार्यकारी अभियंता पद रिक्त आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांवर तात्पुरता भार देण्यात आला असला तरी याठिकाणी कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मुंबई, पुणे नंतर सर्वात मोठा गणेशोत्सव बेळगावमध्ये साजरा होतो. शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील अधिकाधिक मंडळे ही शहर विभाग 1 व 2 अंतर्गत येतात. गणेश मंडळांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, आगमन विसर्जनावेळी लक्ष देण्याची महत्त्वाची जबाबदारी हेस्कॉमकडे असते. थोड्याशा नजरचुकीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. दहावर्षापूर्वी अशीच एक मोठी दुर्घटना बेळगावमध्ये घडली होती. त्यामुळे आगमन व विसर्जनावेळी स्वत: अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे असते.
कायमस्वरुपी अधिकाऱ्याची गरज
शहर उपविभाग 2 चे साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीवकुमार सुखसारे यांची चिकोडी येथे बदली झाली. त्यामुळे हे पद दीड महिन्यांपासून रिक्त आहे. तात्पुरत्या स्वरुपात शहर विभाग 3 चे साहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यांना शहराविषयी माहिती असल्यामुळे गणेशोत्सवात कुठेही अडथळा येऊ नये, याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु कायमस्वरुपी अधिकारी मिळाल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येणार आहे.
हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांवरील ताण वाढला
शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. शहर उपविभाग 2 अंतर्गत शहरासह उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहत येत असल्यामुळे याठिकाणी स्वतंत्र अधिकारी असणे गरजेचे आहे. यामुळे गणेशोत्सवापूर्वी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.









