खड्ड्यांमुळे रस्त्याला डबक्यांचे स्वरुप, गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या दुर्दशेकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे. रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे सद्यस्थितीमध्ये या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा रस्ता राज्य महामार्ग की खड्डे महामार्ग, असा प्रश्न नागरिक व वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे.
जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत-जांबोटी राज्य महामार्ग क्र. 31 अंतर्गत होतो. आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने हा तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आदी राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणात माल व प्रवासी वाहतूक चालते. गोव्याला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग असल्यामुळे हुबळी, धारवाड, बेंगळूर तसेच कोकण आदी ठिकाणी जाणारे वाहनधारक इंधन व वेळेची बचत करण्यासाठी या रस्त्यालाच प्राधान्य देतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे सद्यस्थितीमध्ये या रस्त्याची अवस्था एखाद्या अॅप्रोच रस्त्याला लाजवेल अशीच झाली आहे.
या रस्त्याची रुंदी केवळ साडेतीन मीटर अरुंद तसेच रस्त्याची वजन पेलण्याची क्षमता केवळ 15 ते 20 टनाची आहे. शिवाय संपूर्ण रस्ताघाट वळणाचा व जंगल प्रदेशातून गेला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी या रस्त्याच्या बहुतांश भाग सुस्थितीमध्ये होता. परंतु दोन वर्षांपासून या रस्त्यावरून मल्टी एक्सल अवजड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यामुळे या रस्त्यावरून 50 ते 60 टन वजनाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या रस्त्याची अक्षरश: धूळधाण उडाली आहे. वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळणच झाली आहे. कान्सुली फाटा ते ओलमणी गावापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याला डब्क्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारी सदृश्य चरी पडल्या आहेत. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बाजूपट्ट्या खचल्याने या रस्त्यावर अवजड वाहने रुतण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. वारंवार रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत असल्याने जांबोटी खानापूर बससेवा देखील विस्कळीत होत असल्यामुळे विद्यार्थी व प्रवासी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
गेल्या दोन वर्षापासून जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी सार्व. बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्याची दखल घेऊन गेल्या मे महिन्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे दुरुस्तीचे काम थांबविण्यात आल्याने तसेच गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुर्दशेत अधिकच भर पडली आहे.
जांबोटी-खानापूर रस्ता राज्य महामार्ग की खड्डे महामार्ग? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. खराब रस्त्यामुळे नागरिक व वाहनधारकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर आला असून खड्डेमय रस्त्यातून गणेशमूर्ती कशा आणाव्यात, असा प्रश्न या भागातील नागरिकांना भेडसावित आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना देखील खराब रस्त्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तरी आमदारांनी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून, गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.









