वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी, बीजिंग
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तैवानसंबंधी केलेल्या एका विधानामुळे चीनचा संताप झाला आहे. तैवान हा चीनचा अंतर्गत प्रश्न आहे. तो कसा सेडवायचा हे चीन ठरविणार आहे. त्यासाठी अन्य कोणाच्या सूचना आम्हाला नको आहेत, अशी प्रतिक्रिया चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिली आहे.
माझ्या अध्यक्षपदाच्या काळात चीन तैवानवर आक्रमण करणार नाही, असे चीनने आश्वासन दिले आहे, असे विधान ट्रंप यांनी त्यांच्या पुतीन यांच्याशी अलास्का येथे झालेल्या चर्चेपूर्वी केले होते. मात्र, चीनने असे आश्वासन दिल्याची पुष्टी पेलेली नाही. उलट, तैवान हा चीनचा अंतर्गत प्रश्न असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेच्या व्यापार शुल्काच्या धोरणासंबंधीचा विषय जगाच्या पटलावर असताना या नव्या वादाला तोंड फुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तैवान हा चीनचाच भाग आहे, असे चीनचे प्रारंभापासूनचे प्रतिपादन आहे. मात्र, तैवान स्वत:ला एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र मानत आहे. चीनमध्ये डावी क्रांती झाल्यापासून, अर्थात, 1984 पासून हा वाद आहे.
अमेरिका तैवानच्या पक्षात
अमेरिकेने या वादात नेहमी तैवानचा पक्ष उचलून धरला आहे. अमेरिकेच्या अनेक कंपन्या तैवानमध्ये आहेत. विशेषत: अमेरिकेच्या इलेक्ट्रॉनिक कंपन्या तैवानमध्ये सेमीकंडक्टर निर्मिती मोठ्या प्रमाणात करतात. अमेरिकेच्या या सहकार्यामुळे तैवानची आर्थिक प्रगती चीनपेक्षाही अधिक प्रमाणात झाली असून आज तैवान हा एक आर्थिकदृष्ट्या समृद्ध भाग आहे. चीनचा प्रयत्न तैवानला स्वत:च्या नियंत्रणात घेण्याचा आहे. तर अमेरिकेने तैवानच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व स्वीकारलेले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर या दोन देशांमध्ये वाद आहे.









